इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील इंडिया गेटवर बांधलेली ‘अमर जवान’ ज्योत आता नॅशनल वॉर मेमोरियलच्या ज्योतीसोबत विलीन करण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता अमर जवानची मशाल एका कार्यक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या मशालीत विलीन होणार आहे. या निर्णयावरून काँग्रेससह विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधत आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. इंडिया गेटजवळ आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

इंडिया गेटजवळ आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या मशालीत विलीन करण्याचा निर्णयावर वाद होत असताना पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दोन ठिकाणी ज्योत राखणे खूप कठीण होत आहे. देशातील हुतात्म्यांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आले आहे, तर अमर जवान ज्योतीवर वेगळी ज्योत लावण्याऐवजी इंडिया गेटपासून केवळ 400 मीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात असलेल्या ज्योतीमध्ये ती विलीन केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. तिथे 25,942 सैनिकांची नावे सुवर्ण अक्षरात लिहिली आहेत.

पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या हिंदुस्थानी सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटीश सरकारने ‘इंडिया गेट’ बांधले होते. यानंतर 1972 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात शहीद झालेल्या हिंदुस्थानच्या जवानांच्या स्मरणार्थ ‘अमर जवान’ ज्योती प्रज्वलित करण्यात आली. या युद्धात हिंदुस्थानचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. 26 जानेवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते.