
क्रिकेट सामन्यात खेळत असताना कधीही हार मानू नका. सामना कोणताही असो, शेवटची विकेट पडत नाही तोपर्यंत हार-जीतचा निर्णय लागत नाही. त्यामुळे एक-दोन चांगल्या भागीदाऱ्यादेखील सामन्याचे चित्र पालटू शकतात, असा कानमंत्र हिंदुस्थान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी 12 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी दिला. चर्चगेट येथील ओव्हल मैदानात दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन आयोजित या स्पर्धेत वेंगसरकरांनी शालेय क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडेच नव्हे तर चिकाटी पाळण्याचा मंत्रही दिला. ते म्हणाले, तुम्ही मुंबईच्या आणि पर्यायाने हिंदुस्थानी क्रिकेटचे भविष्य आहात. त्यामुळे भविष्यात अव्वल दर्जाच्या क्रिकेटमध्ये अधिक उंची गाठण्यासाठी आतापासूनच मानसिक परिपक्वता विकसित करण्याचे प्रयत्न करायला हवेत.
























































