
संगमेश्वर ते साखरपा या राज्य मार्गाचे सुमारे 32 कोटी रुपये खर्चून गतवर्षी रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. या मार्गावरील मोऱ्या देखील रुंद करण्यात आल्या. संगमेश्वर येथील मारुती मंदिराजवळील अवघड वळणावर नव्याने उभारण्यात आलेला पूल मात्र वाहतूकीस खूला न केल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत सामनाने वृत्तही प्रसिध्द करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. येथील मार्गाचा काही भाग ढासळल्याने तो वाहतूकीसाठी धोकादायक ठरत होता. येथे तातडीने संरक्षक भिंत उभारण्यात आली असून पूलाच्या दुतर्फा असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हा नवीन पूल वाहतूकीस उपलब्ध होणार असल्याने वाहनचालकांनी या विषयाकडे लक्ष वेधल्याबद्दल सामनाला धन्यवाद दिले आहेत.
संगमेश्वर ते साखरपा हा मार्ग अरुंद असल्याने या मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता या राज्य मार्गाचे रूंदीकरण करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून सातत्याने केली जात होती. खड्ड्यांमुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक आणि कंटाळवाणा बनला होता. अखेरीस संगमेश्वर साखरपा राज्य मार्गासाठी 32 कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र प्रत्यक्षात काम सुरु होण्यास खूपच विलंब झाला. संगमेश्वर साखरपा मार्ग पुढे कोल्हापूरला जोडला गेला असल्याने या मार्गावर दिवसरात्र वाहतूक सुरु असते. वाढत्या वाहतूकीच्या तुलनेत एकाचवेळी दोन वाहनांना जाण्यासाठी हा मार्ग अरुंद होत होता.
या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन सुरु झाल्याने डांबरीकरणाचे काम जवळपास दोन महिने थांबवावे लागले होते. विशेष परवानगीने डांबरीकरणाचे काम सुरु झाले. मात्र, त्यावरील कोटींगचे काम रखडले. गतवर्षी डिसेंबरमध्ये कोटींगचे काम सुरु होइल असे वाटले होते. मात्र ते फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस हाती घेण्यात आले. आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. याबरोबरच गतवर्षी संगमेश्वरच्या मारुती मंदिर जवळील अवघड वळणावर जूनी मोरी धोकादायक बनल्यामुळे जून अखेरीस येथे नवीन पूल उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते.
मारुती मंदिर येथील वळणावर सतत छोटे मोठे अपघात घडत असताना नव्याने उभारण्यात आलेला पूल अद्याप वाहतूकीसाठी का खूला केला नाही, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला होता. या वळणावरच जून्या मार्गावरचा रस्ता ढासळल्याने येथे संरक्षक भिंत उभारुन सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजूला उभारलेला पूल तातडीने वाहतूकीसाठी खूला करावा अशी मागणी वाहनचालकांनी केली होती.
हा पूल वाहतूकीसाठी खूला न केल्यास आंदोलनाचा इशाराही वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी दिला होता. याबाबत सामनाने वृत्त प्रसिध्द करुन बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. आता पूलाच्या दुतर्फा असणारा रस्ता पूर्ण करण्यात आला असून ढासळलेल्या मोरीच्या बाजूने संरक्षक भिंतही बांधण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात नवीन पूल वाहतूकीसाठी खूला होणार असल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.































































