
आयपीएलच्या अंतिम टप्प्यासाठी बंगळुरू आणि पंजाब या संघांनी स्थान निश्चित केल्यामुळे यंदा स्पर्धेला नवा डॉन मिळणार, असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला. मग तो डॉन बंगळुरूसुद्धा असेल किंवा पंजाबही बाजी मारू शकतो. या दोन्ही संघांना गेल्या 17 वर्षांत एकदाही आयपीएलची ट्रॉफी उचलण्यात यश मिळवलेले नाही. त्यामुळे यापैकीच एक संघ विजेता ठरावा, अशी क्रिकेटप्रेमींची मनापासून इच्छा आहे.
कोलकात्याची अनोखी हॅटट्रिक
आयपीएलचा इतिहास पाहाता विजेता संघ साखळीतच बाद होण्याची परंपरा 2013 पासून सुरू झाली होती. त्या आधीच्या पाचही स्पर्धांत विजेत्या संघाने पुढच्या स्पर्धेत प्ले ऑफ गाठले होते. कोलकाता जेव्हा विजेता ठरलाय, त्यानंतर पुढच्या स्पर्धेत ते साखळीतच गारद झालेत. 2012 मध्ये ते प्रथमच विजेते ठरले. मग पुढच्या वर्षी त्यांचा संघ साखळीत बाद झाला. त्यानंतर 2014 च्या स्पर्धेत कोलकात्याने पुन्हा जेतेपद पटकावले आणि मग पुढच्या स्पर्धेत ते साखळीतच संपादले. हाच प्रकार त्यांनी यंदाही केला. गेल्या वर्षी तेच विजेते ठरले आणि यावेळी त्यांचे आव्हान साखळीतच संपले. याचाच अर्थ जेव्हा कोलकाता विजेता ठरलाय, त्याच्या पुढच्या वर्षी ते साखळीतच बाद झालेत.
कोलकात्याप्रमाणे मुंबईचा संघही तीनदा विजेता झाल्यानंतर प्ले ऑफचा टप्पा गाठू शकलेला नाही. मुंबईने 2015 मध्ये आपले पहिलेवहिले जेतेपद जिंकले आणि त्यानंतर ते पुढच्याच स्पर्धेत साखळीतच बाद झाले. हाच प्रकार 2018 मध्येही झाला. मग 2021 मध्येही मुंबईकडून याच दारुण कामगिरीची पुनरावृत्ती झाली. चेन्नईकडून गेल्या चार वर्षांत दोनदा अशा कामगिरीची कामगिरी ओढावलीय. 2021 आणि 2023 मध्ये चेन्नईने चौथ्या आणि पाचव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पण याचदरम्यान 2022 आणि 2024 मध्ये त्यांना साखळीतच बाद होण्याची नामुष्की सहन करावी लागली होती.
फक्त सात संघ आयपीएल विजेते
आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत 15 संघ खेळलेत. पण त्यापैकी केवळ सात संघांनाच जेतेपदाचे चुंबन घेता आलेय. सध्या खेळत नसलेला डेक्कन चार्जर्स हा आता सनरायझर्स हैदराबाद नावाने खेळतोय. तसेच गुजरात आपली केवळ चौथीच स्पर्धा खेळतोय आणि त्यापैकी तीन स्पर्धांत त्याने प्ले ऑफ गाठलेय हे विशेष. दिल्ली, बंगळुरू, पंजाब आणि लखनौ या चार संघांना अद्याप एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. मात्र यावेळी प्ले ऑफ गाठणाऱया तीनपैकी पंजाब आणि बंगळुरू यांना आपल्या जेतेपदांचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी आहे.
…तर नवा विजेत्याची शक्यता वाढणार
प्ले ऑफ गाठण्यात यशस्वी ठरलेल्या मुंबई आणि गुजरातवगळता पंजाब, बंगळुरू संघांना अद्याप जेतेपद मिळालेले नाही. अशा स्थितीत एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकलेल्या बंगळुरू, पंजाब यापैकी एक विजेता होण्याची दाट शक्यता असेल.
विजेते साखळीतच गारद
आयपीएलच्या गेल्या 17 वर्षांच्या इतिहासात विजेते संघ जास्त करून साखळीतच गारद होता. ती परंपरा यंदा कोलकाताने कायम ठेवलीय. गेल्या वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकात्याने तिसऱयांदा यश मिळवले होते. मात्र यंदा कोलकात्याचे पावसाच्या अवपृपेमुळे साखळीतच आव्हान संपुष्टात आले तर श्रेयस अय्यर नेतृत्व करत असलेला लखनौचा संघही प्ले ऑफचा टप्पा गाठण्यात थोडक्यात अपयशी ठरलाय. म्हणजेच विजेते आणि विजेत्या संघाचा कर्णधार दोघेही साखळीतच आटपलेत.
मुंबई, चेन्नईनेच राखलेय जेतेपद
आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई याच दोन संघांनी प्रत्येकी पाचवेळा बाजी मारलीय. तर कोलकाता तीनदा विजेता ठरलाय. पण मुंबई आणि चेन्नई याच दोन संघांना जेतेपद राखण्यात यश लाभलेय. चेन्नईने 2010 आणि 2011 मध्ये सलग जेतेपद संपादलेय तर मुंबईला 2019 आणि 2020 मध्ये याच कामगिरीची पुनरावृत्ती साधता आली होती.