
सामना प्रतिनिधी । लातूर
वेगाने विस्तारत जाणाऱ्या शिक्षणाच्या धंद्यात केवळ 1 रुपयामध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याची घोषणा एमडीए फाऊंडेशच्यावतीने करण्यात आली आहे. इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचे सुरुवातीचे 2 हजार प्रवेश हे केवळ 1 रुपयामध्येच दिले जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत एमडीए फाऊंडेशच्यावतीने देण्यात आली. शिक्षणाच्या धंद्यातील हा नवीन ‘लातूर पॅटर्न’ असून त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
एमडीए फाऊंडेशनने महाराष्ट्र ग्रामिण शैक्षणिक विकास प्रकल्प ‘ई 355’ राज्यातील 355 तालुक्यांमध्ये राबवण्याचे धोरण ठरवलेले आहे. लातूर जिल्ह्यातील कोळपा येथे पहिले संकूल उभे करण्यात आलेले आहे. 2 हजार विद्यार्थ्यांना केवळ 1 रुपयांमध्ये या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेत इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यास 12 पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वर्षाला केवळ 1 रुपया शुल्क भरावे लागणार आहे. इतर कोणतेही छुपे शुल्क वसूल करण्यात येणार नाही. केवळ पालकांना मुलांना शाळेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. राज्यात 355 संकूलांची उभारणी करण्यात येणार असून प्रत्येक संकूलात प्रथम 2 हजार विद्यार्थ्यांना केवळ 1 रुपयाच शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे सुमारे दीड लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एमडीए ग्रुफ ऑफ कंपनी आणि एमडीए फाऊंडेशनच्यावतीने गरीब, कष्टकरी, शेतकरी, जवान, पोलीस, स्वातंत्र्यसैनिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, नैसर्गिक आपत्तीग्रस्त अशा कुटुंबातील दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम, प्रशिक्षीत शिक्षकवृंद, डिजीटल क्लासरुम, अत्याधुनिक ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रिडांगण अशा सर्व सुविधा ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. लातूर जिल्हा मागील अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या पॅटर्नसाठी प्रसिध्द आहे. शिक्षणाच्या धंद्यात चक्क 1 रुपयात वर्षभर शिक्षण देण्याचा हा नवीन लातूर पॅटर्न निर्माण होत आहे.



























































