पेंग्विनसाठी लाइफ सपोर्ट सिस्टम, तज्ज्ञ डॉक्टर, दर्जेदार खाद्य, एसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
penguins-7

सामना प्रतिनिधी । मुंबई

भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी लाइफ सपोर्ट सिस्टम, तज्ज्ञ डॉक्टर, दर्जेदार खाद्य आणि एसीसारख्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी नवीन अनुभवी कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. यासाठी पालिका तीन वर्षांत सुमारे 12 कोटींचा खर्च करणार आहे. पालिकेकडे पेंग्विनची हाताळणी व देखभालीची व्यवस्था करण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारीवर्ग नसल्याने हे काम कंत्राटदाराकडून करण्यात येणार आहे.

भायखळा येथे 53 एकर परिसरात वसलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात प्राणी-पक्षी पाहण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने मुंबई, महाराष्ट्रासह देश-विदेशातून पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून राणीच्या बागेत अत्याधुनिक सुधारणा करून कायापालट केला जात आहे. 18 मार्च 2017 रोजी राणीच्या बागेत पेंग्विन आणल्यापासून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही हजारोंच्या संख्येने वाढ झाली असून राणीच्या बागेचे उत्पन्नही सात पटींनी वाढले आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या पेंग्विनच्या देखभालीसाठी आता परीरक्षण, आरोग्य व्यवस्थापनामध्ये अनुभव असलेल्या आणि तज्ज्ञ-व्यावसायिक कंत्राटदारांकडून काम करून घेतले जाणार आहे. यासाठी मेसर्स हायवे कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला पुढील तीन वर्षांसाठी देखभालीचे कंत्राट देण्यात येणार आहे. या कालावधीसाठी सुमारे 11.50 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

असा आहे पेंग्विनचा आहार

पेंग्विनला दरदिवशी 450 ते 500 ग्रॅम रावस, तारली, बोंबिल आणि ईल इत्यादी प्रकारचे मासे खायला दिले जातात. त्यामुळे महिन्याला सातही पेंग्विन पक्षी 15 ते 16 किलोच्या मासळीचा फडशा पाडतात. पेंग्विनला देण्यात येणाऱ्या माशामध्ये त्यांना आवडणारे बोंबील जास्त प्रमाणात दिले जातात.

या सुविधा पुरविणार

वातानुकूलित यंत्रणा (एचव्हीसी यंत्रणा)

विद्युत यंत्रणा

जीवरक्षक योजना (लाइफ सपोर्ट सिस्टीम)

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा

खाद्य माशांचा पुरवठा