
2020 हे वर्ष संपण्यास आणि नवीन वर्ष सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बँकांच्या कामात काही बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. हे बदल आपल्या चेक आणि कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहारांवर परिणाम करतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यवहारांना सुरक्षित मार्गाने प्रोत्साहन देण्यासाठी हे निर्णय घेतले आहेत.
1 जानेवारीपासून 50 हजार रुपयांहून अधिक चेकच्या व्यवहारांवर ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू होणार आहे. आरबीआयने फसवणूक टाळण्यासाठी तसेच पेमेंट्सची तपासणी करण्यासाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ ही स्वीकारली आहे.
या सिस्टिमनुसार एकदा चेक दिल्यानंतर खातेदार आपली माहिती बँकेशी शेअर करतील. उदाहरणार्थ, चेक क्रमांक, चेक वरील तारीख, पैसे देणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक आणि रक्कम इ. पेमेंट करण्यापूर्वी खातेदाराने दिलेल्या माहितीची बँक तपासणी करेल, त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कॉन्टॅक्टलेस डेबिट-क्रेडिट कार्ड आणि यूपीआयसह पिनलेस व्यवहाराची मर्यादा नवीन वर्षापासून 5 हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, 1 जानेवारीपासून ग्राहकांना कॉन्टॅक्टलेस लेनदेन (पिन नंबरशिवाय) वाढीव मर्यादेचा फायदा घेता येणार आहे.




























































