
नोकरी–व्यवसायाच्या निमित्ताने आपण गाव सोडून शहरात आलो खरे पण ती गावची गोडी इथे नाही. अशीच कोकणातल्या एका गावाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते, ‘कोकणकन्या रिटर्न’ या कॅफे मराठीच्या नव्या युट्युब सीरिजमधून.
ही गोष्ट आहे राधाची आणि तिच्या भावविश्वाची. अनेक वर्षे आपल्या गावापासून दूर राहिलेली राधा अचानक काही कामानिमित्त आपल्या गावी कोकणात परतते. इथे आल्यावर तिला आपले घर, बालपणाच्या गोष्टी आठवू लागतात. गावची माती आणि नाती यांची खरी गोडी तिला आपल्या कोकणातल्या या छोट्याशा गावात लोकांना भेटून येते. गावातल्या लोकांचे निरागस वागणे, तेवढय़ाच जोरात भांडण करून पुन्हा दुसऱ्या क्षणी गोड होणे.
एकमेकांच्या सुखदुखात सामील होणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे छोटय़ा गोष्टींमध्ये आनंद शोधणे. खरंतर राधासोबत आपण प्रेक्षक म्हणूनसुद्धा आपल्या गावच्या आठवणीत रमून जातो. कॅफे मराठीच्या निखिल रायबोले अणि भूपेंद्रकुमार नंदन निर्मित या सीरिजमध्ये राधा ही मध्यवर्ती भूमिका वैष्णवी खाडे हिने साकारली आहे तर तिच्यासोबत अस्सल कोकणचे स्थानिक कलाकार आहेत.



























































