NZ vs IND तिसरा सामना देखील पावसामुळे रद्द, न्यूझीलंडने वनडे मालिका 1-0 ने जिंकली

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी पावसामुळे रद्द करण्यात आला. हिंदुस्थानने दिलेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसामुळे खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या 1 बाद 104 धावा झाल्या होत्या. पाऊस येण्याच्या आधी डेव्हॉन कॉनवे 38 धावांवर नाबाद होता, तर कर्णधार केन विल्यमसनने खातेही उघडले नव्हते.

न्यूझीलंडने फिन ऍलनची (57) एक विकेट गमावली होती. डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडने 50 धावांची आघाडी घेतली होती. परंतु सामना पूर्ण करण्यासाठी किमान 20 षटके खेळणे आवश्यक होते. फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाल्यानंतर हिंदुस्थानचा डाव 219 धावांवर आटोपला. हॅमिल्टन येथे झालेल्या पहिल्या वनडेत न्यूझीलंडने सात गडी राखून विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला.

हिंदुस्थानने दिलेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 104 धावा केल्या होत्या. मात्र पाऊस थांबलाच नाही. अशा स्थितीत सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला आणि किवी संघाने 1-0 ने मालिका खिशात घातली. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन या मालिकेत सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकण्यात यशस्वी ठरला. तीनही सामन्यांमध्ये त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.