
सामना ऑनलाईन । वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध माऱयापुढे आज स्टार खेळाडूंच्या टीम इंडियाने पार लोटांगण घातले आणि पहिल्या टी-20 लढतीत हिंदुस्थानाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणारा हिंदुस्थानी संघ आपल्या प्रतिष्ठsस साजेसा खेळ करू शकला नाही. सलामीच्या विजयाने न्यूझीलंडने तीन टी-20 लढतीच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक जिंकून यजमान संघाला फलंदाजीला पाचारण करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय संघाच्या पार अंगलट आला. यजमानांचे सलामीवीर टीम सीफर्ट (43 चेंडूंत 84 धावा) आणि कॉलिन मुन्रो (20 चेंडूंत 34 ) या जोडीने 8.2 षटकांत 84 धावांची तुफानी भागीदारी रचत संघासाठी भक्कम पाया रचला. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन (22 चेंडूंत 34) आणि रॉस टेलर (14 चेंडूंत 24) यांनी संघाला द्विशतकी धावसंख्येपार नेण्यात सिंहाचा वाटा उचलला. न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 219 अशी मजल मारत विजयासाठी 220 धावांचे जबर आव्हान हिंदुस्थानपुढे ठेवले. न्यूझीलंडने दिलेले 220 धावांचे आव्हान पार करताना हिंदुस्थानाचा डाव पार कोलमडला. 19.2 षटकांत हिंदुस्थानी संघ फक्त 139 धावांपर्यंत मजल मारू शकला.
धोनीची झुंज अपयशी
टीम इंडियाचे अन्य स्टार फलंदाज अपयशी ठरत असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 31 चेंडूंत 39 धावांची खेळी केली, पण त्याची झुंज संघाचा लाजिरवाणा पराभव टाळू शकली नाही. त्याला विजय शंकर (27), कृणाल पांडय़ा (20) यांनी चांगली साथ दिली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या एक धावेवर झेलबाद झाला. केवळ शिखर धवन (29), विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पाडय़ाने दोन आकडी धावा केल्या.
































































