चिंचोली रेल्वेस्थानकावर नवजात अर्भक सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी रेल्वे स्थानकापासून 10 किमी. अंतरावरील चिंचोली (बु) या रेल्वे स्थानकावर आज सकाळी 10 च्या सुमारास जिवंत अवस्थेत नुकताच जन्म झालेले नवजात अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

बाळाचा जन्म आज पहाटेच्या सुमारास झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी आजूबाजूला रक्ताचे डाग दिसून आल्याने तसेच बाळाची नाळसुद्धा कापली गेली नसल्याने सदर बाळाचा जन्म काही तासांपूर्वीच झाला असावा व त्यानंतर मातेने चिंचोली स्थानकावर सकाळी 9 च्या सुमारास रेल्वे येण्याच्या काही काळ आधीच या बालकाला सोबत घेऊन आली आणि रेल्वे येताच नवजात बालकाला बेवारस अवस्थेत सोडून रेल्वेने निघून गेली असल्याची चर्चा जनमानसात सुरू होती. या ठिकाणावरून रेल्वे निघून जाताच सदर घटना उघडकीस आली. घटनेची माहिती चिंचोली गावात पसरताच गावकऱ्यांनी सदर बालकाला तात्काळ ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी दाखल केले. सदर बालकाची प्रकृती स्थिर असून सध्या त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.