न्यूझीलंडची विजयी सलामी; श्रीलंकेवर 10 गडी राखून दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

श्रीलंका आणि न्यूझींलडमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडच्या झंझावाती गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 136 धावांमध्ये गारद झाला. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी नाबाद राहत अर्धशतकी खेळी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांकडून झालेल्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा संघ गडगडला. पहिल्याच षटकात लहिरु थिरीमनेला माघारी धाडत मॅट हेन्रीने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. यानंतर करुणरत्ने आणि कुशल पेरेरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. मात्र पेरेरा माघारी परतल्यानंतर श्रीलंकेच्या डावाला पुन्हा एकदा गळती लागली. मधल्या फळीतला एकही फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. न्यूझीलंडच्या मॅथ्यू हेनरी आणि लोकी फरग्युसन या दोघांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर ग्रँडहोम, मिचेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट आणि जेम्स निशेम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. श्रीलंकेकडून कर्णधार करूणारत्ने याने अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याला कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही आणि श्रीलंकेचा डाव 136 धावात आटोपला.

137 धावांचे माफक आव्हान पूर्ण करताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी अर्धशतकी खेळी केली. मार्टिन गप्टिल याने 51 चेंडूंमध्ये 73 धावा काढल्या तर कॉलीन मनरो याने 47 चेंडूंमध्ये 58 धावांची खेळी केली. श्रीलंकेचा एकही गोलंदाज न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडू शकला नाही. त्यामुळे नाबाद राहून न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.