
नालासोपारा येथून ड्रग विक्रीसाठी आलेल्या नायजेरियनला मालवणी पोलिसांनी अटक केली. गॅब्रियल ओझोमेना असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एमडीएमए एक्सटेक्सीच्या 20 गोळ्या, एलएसडी पेपर जप्त केले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
मालवणी परिसरात ड्रगची विक्री करणाऱ्यावर पोलीस सतत कारवाई करत आहेत. एक नायजेरियन हा ड्रग विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक निलेश साळुंखे, पाटील, राठोड, शिंदे, वळतकर, आव्हाड याच्या पथकाने तपास सुरु केला. बुधवारी रात्री पोलिसांनी जन कल्याण नगर येथे सापळा रचून अटक केली.
























































