रात्रशाळांसाठी महापालिका, खासगी शाळांमधील वर्ग खुले; विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकेही मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रशाळांसाठी वर्ग उपलब्ध न होणे, शिक्षकांची मोठय़ा प्रमाणावर कमतरता आणि यामुळे रोडावत चाललेली विद्यार्थी संख्या हे चित्र आता लवकरच बदलणार आहे. मुंबईसह अन्य महानगरपालिका आणि खासगी शाळांमधील वर्ग, प्रयोगशाळा, वाचनालय, खेळाचे मैदान, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी रात्रशाळांसाठी खुले करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी घेतला. यापुढे महापालिका आणि खासगी शाळांमधील वर्गांसाठी रात्रशाळांकडून कोणतेही भाडे आकारण्यात येणार नाही. त्यामुळे लवकरच रात्रशाळा नव्याने गजबजलेल्या पाहयला मिळणार आहेत.

रात्रशाळांवर होणारा 34 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च वाचविण्यासाठी दिवसासह रात्रशाळेत काम करणाऱया दुबार शिक्षक कमी करण्याचा निर्णय 17 मे 2017 रोजी घेण्यात आला. या शासन निर्णयात दुबार शिक्षकांच्या जागी अतिरिक्त शिक्षकांना समावून घेण्याचे ठरविण्यात आले. खासगी शाळांतील कर्मचारी सेवा शर्ती नियम 1981 मधील नियम 22(2)(ग) आणि 23(1)(ब) नुसार शिक्षकांना दुबार काम करण्याची सवलत देण्यात आली आहे. या अधिनियमाशी मे 2017 चा शासन निर्णय विसंगत असल्याने शालेय शिक्षण विभागाने काल 30 जून रोजी सुधारित शासन निर्णय जाहीर केला असून यात मे 2017 पूर्वी जे शिक्षक रात्रशाळेत कार्यरत होते त्या शिक्षकांच्या सेवा नियमानुसार कायम करण्यात येणार आहेत. तसेच रात्रशाळेत दुबार शिक्षकांना नियुक्त करण्याआधी विभागातील शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत का याची खात्री करण्यात येणार आहे. दुबार शिक्षकाची नियुक्ती करताना दिवसा शाळेतील नियमित शिक्षक म्हणून कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असण्याची अट ठेवण्यात आली आहे.

अडीच तासांची रात्रशाळा

रात्रशाळांमधील दैनंदिन काम हे अडीच तासांचे असणार आहे. शिवाय शिक्षकांचा कार्यभार अर्धवेळ असेल. जे शिक्षक रात्रशाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करीत आहेत किंवा होते. तसेच ते कोणत्याही दिवसा शाळेत कार्यरत नाहीत अशा शिक्षकांच्या सेवा या शासन निर्णयानुसार यापुढेही कायम ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यात 176 रात्रशाळा असून एकटय़ा मुंबईत 150 हून अधिक रात्रशाळा, ज्युनियर कॉलेज आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून 1 हजार 358 दुबार शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. तर माध्यमिक रात्रशाळेतील 865 दुबार शिक्षकांच्या सेवासमाप्तीनंतर त्याजागी दिवसा शाळेतील 174 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. त्यामुळे रात्रशाळांची पटसंख्या रोडावत होती.