
>> नीलेश कुलकर्णी
मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काय लागणार याच्या धास्तीने सध्या काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे ‘पल्स रेट’ वाढले आहेत. 2014 मध्ये भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढ या राज्यांत 65 पैकी 61 जागा मोदी ‘लाटे’मध्ये खिशात टाकल्या होत्या, मात्र सध्या या तिन्ही राज्यांमध्ये भाजपची वाटचाल कठीण आहे. भाजपचे लोकसभेचेही गणित या निकालांमुळे बिघडू शकते. त्यामुळे शिवराजसिंग चौहान, वसुंधराराजे आणि ‘चावलवाले’ रमणसिंग यांच्यासोबतच संपूर्ण भाजपनेच देव पाण्यात ठेवले आहेत. या निवडणुकांमध्ये गमावण्यासारखे काही नसल्याने जे मिळेल तो काँग्रेससाठी बोनस ठरेल. तेव्हा पाण्यात ठेवलेले देव कोणाकोणाला पावतात हे 11 डिसेंबरला कळेलच.
आगामी लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत भाजपला किमान 70 ते 80 जागा कमी मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात मध्य प्रदेश व राजस्थानात विधानसभेची सत्ता हातातून निसटली तर भाजपची चिंता वाढणार आहे. राजस्थानात भाजपने गेल्या वेळी सर्वच्या सर्व जागा जिंकून काँग्रेसला वाळूत लोळवले होते. मात्र त्या वाळूतून उठून काँग्रेस आता भाजपची परतफेड करण्याइतपत राजस्थानात तरी मजबूत झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपला सत्ता अगदी निसटत्या फरकाने गमवावी लागेल अशी चर्चा विक्रमी मतदानानंतर सुरू झाली आहे. मतदानाचा टक्का वाढला की सत्ताधार्यांचा ठोका चुकतो हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे विकास करूनही शिवराजमामांचे यावेळी काही खरे नाही अशी चर्चा रंगली आहे. त्यात मध्य प्रदेश अगदी काठावर जिंकले तरी शिवराज यांच्याऐवजी कैलाश विजयवर्गीय यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकून मामांना केंद्रात मंत्री करण्याचा भाजप नेतृत्वाचा मनोदय असल्याचे समजते. पाच राज्यांच्या निवडणुकांत पंतप्रधान, भाजपाध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अगदी पूर्ण ताकतीनिशी प्रचार केल्याने या निवडणुकांना ‘ग्लॅमर’ मिळाले हे खरेच. याच निवडणुकीत राहुल यांनीही भाजपच्या सततच्या मागणीला कंटाळून आपण कौल दत्तात्रेय ब्राह्मण असल्याचे सांगत भाजपला धोबीपछाड मारला. ‘कौल दत्तात्रेय ब्राह्मण’ या गोत्राचा उल्लेख करत राहुल यांनी भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा संकल्प ‘आचमन’ वगैरे करून सोडला आहे. पाच राज्यांचे निकाल राहुलबाबांचा संकल्प किती पूर्ण करतात हे दिसेलच.
योगींचा ‘हनुमान’
‘करायला गेलो हनुमान, झाले माकड’ अशी मराठीत एक म्हण आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी बेतालपणाची माकडे तयार करण्याचे जे तंत्र साधले आहे ते विलक्षण आहे. तोंड बंद ठेवा अशी सक्त ताकीद खुद्द पंतप्रधानांनी दिली असतानाही भाजप नेते तोंडाचा पट्टा चालूच ठेवत आहेत. विनोदनिर्मिती करून जनतेची करमणूक करत स्वतःची आणि पक्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत. त्यात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उडी घेतली आहे. महाबली हनुमानाच्या ‘जाती’चा उल्लेख करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आदित्यनाथ हे योगी वगैरे म्हणवून घेतात. त्यांच्या अंगावरची भगवी वस्त्रे पाहूनच भाजपने त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केले. मात्र योगींनी मुख्यमंत्री म्हणून भव्यदिव्य केले नसले तरी भाजपचा ग्राफ झपाट्याने खाली नेण्याचे काम ते करत आहेत. इतकी वर्षे मनुष्याच्या जातीपातीचे राजकारण रटरटत असताना योगींनी रामभक्त हनुमान हे ‘दलित’ असल्याचे सांगून आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचे प्रदर्शन जगजाहीर केले. योगी हे ढोंगी आहेत अशी टीका करत ब्राह्मण महासंघाने त्यांच्यावर बदनामीची नोटीस बजावली आहे. हे सर्व घडत असताना केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग कसे मागे राहतील? यापूर्वी न्यूटनसह अनेक शास्त्रज्ञांचे सिद्धांत खोटे ठरवून त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली आहे. त्यांनीही हनुमान ‘आर्य’ असल्याचे ठासून सांगितले. पाठोपाठ भाजपचे आदिवासी नेते ज्ञानदेव आहुजा यांनी हनुमान हा आदिवासींचा आद्य नेता असल्याचे तारे तोडले. योगी आदित्यनाथ यांच्या बेतालाची दखल घेत अखेर उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना ‘सार्वजनिक ठिकाणी बोलताना मर्यादांचे पालन करा. अटलजींचा काही तरी आदर्श घ्या’, असे कान टोचावे लागले.
राज्यपाल असेही आणि तसेही…
जम्मू-कश्मीरमध्ये भाजपेतर सरकार सत्तेवर येण्याचा सुगावा लागताच तिथले राज्यपाल सत्यपाल मलिकांनी ज्या पद्धतीने विधानसभा भंग केली आणि पाठोपाठ राजकीय कोलांट्या उड्या मारल्या त्यावरून त्यांची कीव यावी अशी परिस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी राज्यपालासारखे ‘पांढरे हत्ती’ असणारे पद पोसताच कशाला? काय उपयोग आहे त्या राज्यपालांचा आणि त्यांच्या तामझामाचा, असा सवाल करत शरद यादवांनी राज्यपालपद रद्द करा अशी मागणी संसदेत केली होती. ती कशी समर्पक आहे हे असंख्य घटनांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. कश्मीरमध्ये ओमर व मेहबुबा मुफ्तींचे सरकार सत्तेवर यावे यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचे विनोदी विधान भाजपचे एक नेते राम माधव यांनी केले. त्यामुळे पक्षाची उरलीसुरली अब्रू जाण्याअगोदर राज्यपाल सत्यपाल यांनी विधानसभाच भंग केली आणि त्याचे ‘अपश्रेय’ वरिष्ठांवर येणार नाही याची काळजी घेत स्वामीनिष्ठsला जागले. एकीकडे जम्मू-कश्मीरची परिस्थिती पुन्हा चिघळण्याची शक्यता असताना अरुणाचलचे राज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा यांनी आपल्या वर्तनाने आदर्श निर्माण केला आहे. तवांगमधील कार्यक्रमाला राज्यपाल तेथील मुख्यमंत्री पेमा खांडूंसोबत गेले होते. त्या ठिकाणी स्थानिक आमदाराने एक गर्भवती महिला अत्यवस्थ असून तिला तातडीने इटानगर येथे नेण्याची गरज असल्याचे थेट मुख्यमंत्र्यांना सांगितले. तवांग ते गुवाहाटीदरम्यान आगामी तीन दिवसांत हेलिकॉप्टर सुविधा उपलब्ध नसल्याची अडचणही या आमदाराने सांगितली. त्यावर राज्यपाल मिश्रा यांनी त्या गर्भवती महिलेला आपल्या हेलिकॉप्टरमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर त्या महिलेच्या पतीला सोबत घेण्यासाठी आपल्या दोन अधिकार्यांना हेलिकॉप्टरमधून उतरवले. पुढील उपचारापर्यंत राज्यपाल महोदय लक्ष ठेवून होते. मिश्रा यांच्यातील ‘सैनिक’ मदतीच्या वेळी जागा झाला. जम्मू-कश्मीरचे राज्यपाल आणि अरुणाचलचे राज्यपाल यांच्या वागणुकीचा फरक यामुळे समोर आला.































































