
>> निळकंठ कुलकर्णी
श्री गुरुदेव दत्त
।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।
शके १८३४ या वर्षी आषाढ महिना अधिक आला होता. चिखलदा येथे आल्यावर प्रथम श्री स्वामी महाराजांनी काही काळ आपला मुक्काम तेथील श्रीराम मंदिरात केला होता. नंतर काही दिवसांनी नर्मदा मंदिरात राहण्यास गेले. मात्र निज आषाढातील कडछातीत मुक्काम करून त्यांनी आपले बाविसावे चातुर्मास्य येथे सुरू केले. चिखलदा येथे येण्याची श्री स्वामी महाराजांची ही तिसरी वेळ होती. त्यामुळे त्यांचा पुष्कळशा मंडळींशी परिचय होताच येथे दक्षिणी ब्राह्मणांची मोजून चार घरे होती. परंतु श्री स्वामी महाराज चातुर्मास्य निमित्त चिखलदा येथे येऊन राहिल्याचे कळल्यावर आजू बाजूच्या इंदूर, निसरपूर, नागपूर अशा निरनिराळ्या ठिकाणाहुन बरीच मंडळी येथे राहण्यासाठी आली. त्यामुळे भिक्षेचा प्रश्न पडला नाही.
श्री स्वामी महाराजांचा चातुर्मास सुरू झाला तरी येथे पाऊस सुरू झाला नव्हता. त्यामुळे श्रावण महिन्यात कॉलरा सुरू होऊन बरीच माणसे मृत्युमुखी पडली. या विकाराच्या शमनार्थ स्वामी महाराजांनी श्री दुर्गासप्तशतीचे पाठाचे व त्याच्या हवनाचे अनुष्ठान करविले. या काळात परगावाचे लोक दर्शनासाठी आले तर श्री स्वामी महाराज त्यांना लगेच परत जाण्यास सांगत. कारण कॉलऱ्याचा जोर वाढला होता. मृत्यूचे अक्षरशः तांडव सुरू होते. जाळायला लाकडे, गोवऱ्या मिळणेही कठीण झाले होते. पुढे पुढे स्वयंपाकासाठी लाकडे मिळण्याची पंचाईत झाली, तेव्हा बढवाई संस्थानचे खाजगी दिवाण व काही मंडळी स्वयंपाकासाठी लागणारी लाकडे पाने पत्रावळी इत्यादी वस्तू वरचेवर चिखलद्यास पाठवीत असत. चातुर्मास्य संपल्यानंतर पाच महिने श्री स्वामी महाराजांचा मुक्काम चिखलद्यास होता, तो पर्यंत हे सर्व सामान पाठवण्याची सेवा त्यांनी केली.
चिखलद्याची महामारीची साथ अजूनही फारशी आटोक्यात आली नव्हती. म्हणून श्री स्वामी महाराजांनी तेथील लोकांना देवीचे अनुष्ठान करण्यास सांगितले. परंतु ही गोष्ट तेथील लोकांना पसंत पडली नाही. त्यामुळे त्या लोकांनी श्री स्वामी महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून श्री स्वामी महाराज दंड व कमंडलू घेऊन गावाच्या सीमेवर जाऊन बसले. हे पाहताच सर्व लोक त्यांच्या जवळ आले व म्हणाले, “महाराज! चातुर्मास्य चालू असता आपण येथे येऊन का बसला आहात ? आपण आमच्यावर रागावला आहात का?” हे ऐकून श्री स्वामी महाराज म्हणाले “तुमच्या हिताचे सांगितले तरी कोणी ऐकत नाही, त्यामुळे गावात महामारीची साथ वाढत चालली आहे. हा चाललेला संहार आम्हला उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही. म्हणून हे गाव सोडून जाण्याचे आम्ही ठरविले आहे!” हे ऐकून सर्व लोक भयंकपित झाले व म्हणाले, “आमचा अक्षम्य अपराध झाला आहे. त्याबद्दल क्षमा करा. आपण सांगाल तसे अनुष्ठान आम्ही सर्वजण करू. तरी कृपा करून आपले चातुर्मास्य देवेच यथाशास्त्र पूर्ण करावे!” ही हात जोडून केलेली प्रार्थना ऐकून श्री स्वामी महाराजांचे अंत:करण द्रवले व ते मुक्कामावर परत आले नाही.


























































