धक्कादायक! निर्भयाच्या मित्राने मुलाखतीसाठी वाहिन्यांकडून उकळले पैसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत 16 डिसेंबर 2013 ला धावत्या बसमध्ये झालेल्या भयंकर निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला होता. त्या घटनेनंतर देशभरात आंदोलनं झाली होती. निर्भयावर बलात्कार करणाऱ्या नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

निर्भयावर बलात्कार झाला तेव्हा तिचा मित्र देखील तिच्यासोबत होता. त्या मित्राने त्यावेळी अनेक वाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. त्याच्या त्या मुलाखती खूप गाजल्या देखील होत्या. मात्र त्याच मित्राने नंतर वाहिन्यांना मुलाखती देण्यासाठी चक्क लाखो रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध हिंदी वृत्त वाहिनीच्या वरिष्ठ पत्रकाराने ही धक्कादायक माहिती दिली आहे. अजित अंजूम असे त्या पत्रकाराचे नाव असून त्यांनी ट्विटरवरून हा धक्कादायक खुलासा केला आहे.

‘निर्भयाच्या आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर बऱ्याच वृत्त वाहिन्यांवर निर्भयाच्या मित्राची मुलाखत दाखवली जात होती. मी तेव्हा न्यूज 24 चा मॅनेजिंग डायरेक्टर होतो. मी देखील माझ्या सहकाऱ्याला निर्भयाच्या मित्राला घेऊन यायला सांगितले. त्या सहकाऱ्याने मला फोन करून सांगितले की तिचा मित्र मुलाखतीसाठी एक लाख रुपये मागतोय. त्याने कमीत कमी 70 हजार घेणार असे सांगितले. ते ऐकून मी हादरलोच. खूप राग आला होता. ज्या मुलासमोर निर्भयासोबत इतका भयंकर प्रकार घडला. त्याने तिच्या किंकाळ्या ऐकल्या. ती हे जग सोडून गेली. तो माणूस आज पैसे मागतोय. त्याच्या डोळ्यात मला कुठेही दुख दिसत नाही’, असे ट्विट अजित अंजूम यांनी केले आहे.