मी अंदाज लावत बसत नाही, जिंकायचं म्हणजे जिंकायचं! उद्धव ठाकरेंचा निर्धार

3143

काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या करमाळा मतदार संघातील नेत्या रश्मी बागल यांनी बुधवारी ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांचे भाऊ, कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना झिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या.

बागल यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. महाराष्ट्रातील राजकारण, शिवसेना-भाजपमधील पक्षप्रवेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेली ईडीची नोटीस, चिदंबरम यांच्यामागे लागलेली ईडी यावर विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.

शिवसेना भाजपमधील पक्षप्रवेशांमुळे युती संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ‘आमची युती आहेच, आमचं ठरलं आहे त्यामुळे ज्या प्रमाणे ठरलं आहे तसंच सुरू आहे’, असं त्यांनी स्पष्ट केलं. युती किती जागा जिंकणार यावर ते म्हणाले की, ‘मी अंदाज लावत बसत नाही, शिवसेना पक्षप्रमुखांचा विचार आहे त्या प्रमाणे जिंकायचं म्हणजे जिंकायचं.’

राज ठाकरे यांच्या ईडी नोटीसवर प्रतिक्रिया 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिळालेल्या ईडीच्या नोटीसीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘चौकशीतून काही निघेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आणखी एक-दोन दिवस थांबायला हरकत नाही’. तसेच पी. चिदंबरम यांच्या विषयी प्रश्न विचारला असता सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ‘मी काही तज्ज्ञ नाही. आज पक्ष प्रवेशाचा मुद्दा महत्वाचा आहे’, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या