अयोध्याप्रकरणी सुनावणी सुरू, 2.77 एकर जागेवर निर्मोही आखाडय़ाचा दावा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अयोध्याप्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणीस सुरुवात झाली. यावेळी निर्मोही आखाडय़ाच्या वतीने युक्तिवाद करताना वकिलांनी 2.77 एकर जागा आमचीच मालकी आहे. ती जागा रामजन्मभूमी म्हणून ओळखली जाते. शेकडो वर्षांपासून सीता रसोई, कोर्टयार्ड आणि मंदिराच्या जागेवर आमची मालकी आहे, असा दावा करण्यात आला. 1934 पासून मुस्लिमांना नमाज अदा करण्यास त्या ठिकाणी मज्जाव आहे असेही न्यायालयात सांगण्यात आले.

मध्यस्थता समितीचे प्रयत्न असफल ठरल्यानंतर नियमित सुनावणी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात घेतला. आठवडय़ातून तीन दिवस मंगळवार, बुधवार आणि गुरुवार सुनावणी होणार आहे. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमुर्तींचे हे घटनापीठ आहे. पहिल्या दिवशी आज निर्मोही आखाडय़ाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सुशील कुमार जैन यांनी केला.
मुस्लिमांच्या शरियत कायद्यानुसार कोणत्याही जमिनीवर बेकायदा कब्जा करुन मशिदीचे निर्माण करता येत नाही, अशी मशिद इस्लामला मान्य नाही, अशा जमिनीवर अदा केलेली नमाज मंजूर होत नाही, असेही निर्मोही आखाडय़ाच्या वकिलांनी सांगितले. रामजन्मभूमिवर बनवण्यात आलेल्या मशीदीत 1934 पासून पाचवेळा नमाज अदा करणे बंद झाले. 16 डिसेंबर 1949 पासून शुक्रवारची नमाजही मुस्लिम अदा करीत नाहीत याकडे निर्मेही

आखाडय़ांच्या वकिलांनी लक्ष वेधले.
1961 मध्ये वक्फ बोर्डाने या जागेवर दावा सांगितला असला तरी या ठिकाणी अनेक पिढय़ांपासून आखाडय़ाकडून पुजापाठ करण्यात येतो. पुजारीच तेथील व्यवस्थापन सांभाळत असल्याचे निर्मोही आखाडय़ाने स्पष्ट केले. मात्र, आम्हाला आमच्या पुजापाठ करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेकडो वर्षापासून सीता रसोई आणि कोर्ट यार्डवर आणि मंदिराच्या जागेवरही निर्मेही आखाडय़ाची मालकी आहे तसेच या जागेवर निर्मेही आखाडय़ाची नोंदणी असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले.

बांधकामाची माहिती व पुरावे सादर करण्याचे निर्देश
जागेवरच्या बांधकामाची माहिती आणि पुरावे सादर करण्याचे आदेश सरन्यायाधिशांनी दिले. तसेच या जागेवर प्रवेश कसा होतो, सीता रसोई किंवा हनुमानद्वार नेमका कोठून प्रवेश होतो, तसेच या जागेवर निर्मोही आखाडा कसा आला याची माहितीही सरन्यायाधिशांनी विचारली. याबाबतची पूर्ण माहिती देण्याचे दिर्नेश सरन्यायाधिशांनी दिले. निर्मोही आखाडय़ातर्फे युक्तीवाद केला जात असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न प्रतिवादीचे वकील राजीव धवन यांनी केला असता तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी वेळ मिळेल तुम्ही कामकाजात अडथळा आणू नका, असे सरन्यायाधीशांनी धवन यांना फटकारले.

लाईव्ह प्रसारणाची विनंती फेटाळली
या प्रकरणी प्रश्नोत्तरेही झाली. त्या जागेवर मशीद होती असा दावा मुस्लिम पक्षकारांच्या वतीने केला. त्यावेळी या जागेवर मशीद होती याचे पुरावे सादर करा, असा आदेशही सरन्यायाधिशांनी दिले आहेत. तसेच आजच्या सुनावणीच्या वेळी यावेळी सुनावणीचे लाईव्ह प्रसारण करण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.