आमच्या मुलांची हत्या केली कोणी? आता देवच न्याय करेल, निठारी पीडितांच्या आईवडिलांचा संतप्त सवाल

nithari-killings-parents-express-helplessness-after-supreme-court-acquits-prime-accused-surendra-koli

देशभरात खळबळ उडविणाऱ्या निठारी हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुरेन्द्र कोली याची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पीडितांच्या आईवडिलांनी हताश मनाने पराभव स्वीकारला असून आता देवच न्याय करेल, अशी भावना व्यक्त केली आहे. कोलीने नाही तर आमच्या मुलांना मारले कोणी, असा संतप्त सवालही मुलांच्या आईवडिलांनी केला आहे.

नोएडातील निठारी येथे राहणाऱ्या मोनिंदरसिंग पंधेर या व्यावसायिकाच्या घरच्या मागील नाल्यात 29 डिसेंबर 2006 रोजी 15 मुलांच्या मृतदेहांचे अवशेष सापडले होते. कोली याला एकूण 13 पैकी 12 प्रकरणांत निर्दोष ठरविण्यात आले होते. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्याला शेवटच्या प्रकरणातूनही निर्दोष मुक्त केले. यावर पीडित मुलामुलींच्या आईवडिलांनी नाराजी व्यक्त केली.

आम्हाला आता कोणतीही आशा उरलेली नाही, पण आमच्या मुलांची हत्या केली कोणी आणि आरोपींना इतके वर्षे तुरुंगात का ठेवण्यात आले होते? जणू काही आमच्या मुलांचे काही अस्तित्वच नव्हते, अशी हताश प्रतिक्रिया झब्बूलाल याने दिली. त्यांच्या 10 वर्षीय मुलीचीही हत्या करण्यात आली होती.