
सामना ऑनलाईन । नागपूर
आम्ही मर्द आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी सारे विरोधी पक्ष एकवटले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही असे सांगतानाच जागावाटपाच्या मुद्दय़ावरून विरोधकांच्या एकजुटीचा पोळा फुटेल, असे भाकीत ज्येष्ठ भाजप नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जनतेपुढे जाऊ आणि पुन्हा बहुमत मिळवू असे सांगून ते म्हणाले की, भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले म्हणजे भाजप मजबूत झाला असा त्याचा अर्थ होतो. विरोधक हे विकासाच्या विषयावर राजकारण न करता सांप्रदायिकता वाढवत आहेत. दलित-मुस्लिम समाजाला भीती घातली जात आहे. सरकार राज्यघटना बदलणार आहे असा गैरसमज पसरवला जात आहे असा आरोपही गडकरी यांनी यावेळी केला. पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पेट्रोल दरवाढ, शेतकऱयांचे प्रश्न यांचा फटका बसला असला तरी जनता भाजपवर विश्वास ठेवेल आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असेही ते म्हणाले.



























































