अरुणाचलमध्ये जेडीयूत फूट पडल्याने नितीशकुमार नाराज, रविशंकर प्रसाद यांना मातृशोकानंतरही सांत्वनासाठी गेले नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेडीयू-भाजप आघाडीचे काही खरे दिसत नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचे प्रमुख नितीशकुमार हे नाराज आहेत. इतके नाराज आहेत की, भाजप नेते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर त्यांचे सांत्वन करण्यासाठीही ते गेले नाहीत. त्यामुळे या आघाडीबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

रविशंकर प्रसाद यांच्या मातोश्री विमलादेवी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्याची माहिती प्रसाद यांनीच सर्वांना सोशल मीडियावरून दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशपुमार यांनी दिवंगत विमलादेवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच प्रसाद यांच्याशी फोनवरूनही बोलणे केले. मात्र प्रसाद यांच्या निवासस्थानापासूनच काही अंतरावर एका कार्यक्रमाला जाऊनही नितीशकुमार यांनी प्रसाद यांची भेट घेतली नाही. नितीशपुमार यांच्याकडून पहिल्यांदाच असे घडल्याने चर्चेला ऊत आला आहे.

जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या शनिवारी होत आहे. त्या बैठकीत अरुणाचलमधील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीनंतरच जेडीयू आपली पुढील रणनिती ठरवणार असल्याचे बोलले जात आहे.