
बिहारमध्ये भाजपला धक्का देत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आता आपले लक्ष दिल्लीकडे वळवले आहे. ते सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून ते भाजपविरोधी विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. नीतीश कुमार यांनी मंगळवारी डाव्या पक्षातील सीपीआयचे (एम) महासचिव सीताराम येचुरी यांची भेट घेतली. बिहारमध्ये भाजविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसाच प्रयत्न देशपातळीवरही झाला पाहिजे. त्यासाठी जास्तीतजास्त विरोधी पक्ष एकत्र आले, तर भाजपविरोधी आघाडी अधिक बळकट होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नीतीश कुमार सोमवारी दिल्लीत पोहचले होते. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि जनता दल सेक्युलरचे प्रमुख कुमार स्वामी यांचीही भेट घेतली. त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला शुभेच्छा दिल्या. नीतीश कुमार यांनी सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आम्ही आता एकत्र असल्याने मी दिल्लीत आलो आहे. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे नीतीश कुमार म्हणाले. आमची सर्वांशी चर्चा सुरू आहे. डावे पक्ष, विविध राज्यातील प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले तर भाजपविरोधात मोठी आघाडी उभी राहील, ही मोठी गोष्ट असेल, असे ते म्हणाले. भाजपिरोधी पक्षांना एकत्र आणणे, हाच आपला हेतू आहे. पंतप्रधान बनण्याची आपली इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आमचे आधीपासून चांगले संबंध आहेत. काही कारणाने आमच्यात मतभेद निर्माण झाले होते. आता आम्ही पूर्वीपेक्षाही अधिक बळकटीने एकत्र येत आहोत, असे सीताराम येचुरी यांनी सांगितले. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नीतीश कुमार यांचा दिल्ली दौरा विरोधकांसाठी सुखद असल्याचे येचुरी म्हणाले. त्यांनी येथे येत देशासाठी चांगले संकेत दिले आहेत. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत संविधानाचे रक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करणे ही पहिली पायरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नीतीश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, जनता दल सेक्युलरचे कुमारस्वामी, सीपीआयचे (एम) महासचिव सीताराम येचुरी यांची भेट घेतली असून ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. सपा प्रमुख अखिलेश यादव, सीपीआय नेते डी. राजा आणि आयएनएलडीचे नेते ओमप्रकाश चौटाला यांची भेट घेणार आहेत.



























































