बिहार निवडणुकीनंतर एनडीए सोडणार नितीश कुमार; चिराग पासवान यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए सोडणार, असा खळबळजनक दावा लोक जनशक्ती पार्टीचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे.

चिराग पासवान म्हणाले की, निकालानंतर नितीश कुमार भाजपची साथ सोडून राज्यातील मुख्य विरोधीपक्ष असलेल्या आरजेडीच्या नेतृत्वात महायुतीत सामील होणार. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एनडीएला आवाहन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

बिहार विधानसभा निवडणुका 2020 मध्ये चिराग पासवान यांनी आपल्याला मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे म्हणत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बिहार निवडणुकीनंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपाला पाठिंबा देणारा असल्याचे ते म्हणाले आहेत.

नितीश कुमार राजकारणातील पलटूराम असल्याची टीका चिराग पासवान यांनी केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी दीर्घ राजकीय संघर्षानंतरही नितीश कुमार यांनी त्यांच्याशी हातमिळवणी करत बिहारमध्ये सत्तेत आले. काही वर्षांनंतर त्यांनी जुन्या मित्रपक्ष असलेल्या भाजपाशी संबंध तोडले आणि आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याशी युती केली. ते पुन्हा असं करू शकतात, असा दावा चिराग पासवान यांनी केला आहे.