
अनेक महिन्यांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करूनदेखील बृजभूषण सिंग यांच्यावर कारवाई होत नसल्याने आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी आपला लढा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हिंदुस्थानचे प्रमुख कुस्तीपटू ऑलिम्पिक पदक विजेते आणि इतर देशांतील खेळाडूंशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. तसेच बृजभूषण सिंग यांच्यावर अटकेची कारवाई न झाल्यास 21 मेनंतर मोठा निर्णय घेण्याचा इशाराही या कुस्तीपटूंनी दिला आहे.
हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश पह्गाट यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचे अव्वल कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत.
विनेश पह्गट म्हणाली, आता आम्ही हा विरोध जागतिक स्तरावर करू. आम्ही इतर देशांतील ऑलिम्पियन आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांशी संपर्क साधणार आहोत. त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही त्यांना पत्रही लिहू. कुस्तीपटू केवळ निषेधाच्या ठिकाणीच मर्यादित राहणार नाहीत, तर देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या दुर्दशेची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.



























































