शिक्षणाच्या आयचा घो, दहावी नापासांना ‘आयटीआय’ची दारे बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दहावी नापास विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची दारेही आता बंद झाली आहेत. डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग, नवी दिल्लीने (डीजीटी) अनेक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक अर्हतेत बदल केला असून यापुढे दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांनाच आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार आहे.

यापूर्वी काही अभ्यासक्रमांना दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश मिळत होता; पण यंदाच्या वर्षापासून दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी आयटीआयमध्ये एकही कोर्स उपलब्ध नाही. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डीजीटीने आयटीआयसाठी नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. तसेच सर्व अभ्यासक्रमांची पातळी ‘नॅशनल स्किल क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क’ (एनएसक्यूएफ)नुसार वाढविण्यात आली आहे.

  • गवंडी, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, टेलरिंग, प्लंबर, वायरमन, पत्रे कारागीर या अभ्यासक्रमांसाठी असणारी दहावी नापास या अर्हतेत बदल करून यंदापासून फक्त दहावी पास विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे.
  • आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्रमाणपत्रावर ‘एनएसक्यूएफ’ पातळीचा उल्लेख होणार आहे. या प्रमाणपत्राच्या जोरावर विद्यार्थी देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही काम करण्यास पात्र ठरणार आहे.

इलेक्ट्रिशियन, वायरमेन, मेकॅनिकला पसंती

आयटीआयमधी इलेक्ट्रिशियन, वायरमेन, मेकॅनिकल, मोटर व्हेईकल मेकॅनिक, फिटर ऑन डिमांड या अभ्यासक्रमांना मागणी आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये या अभ्यासक्रमांच्या एका जागेसाठी सुमारे 40 ते 60 विद्यार्थी अर्ज करीत आहेत. या वर्षीही हा ट्रेंड पाहायला मिळणार आहे. दहावीनंतर आता विद्यार्थी आयटीआयच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे पसंत करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत इलेक्ट्रिशियनच्या 40 हजार 835 जागांसाठी तब्बल 25 लाख 40 हजार 42 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. याचाच अर्थ एका जागेसाठी 62 विद्यार्थी रांगेत आहेत.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक न लागल्याने विद्यार्थी-पालकांचा संताप

दहावीचा निकाल लागताच अकरावी प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर केले जाते. परंतु 8 जूनला निकाल जाहीर झाल्यानंतर अद्याप अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक न लागल्याने विद्यार्थी आणि पालकवर्ग संतप्त झाला आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे अर्ज भरण्यास गेल्या 27 मे पासून सुरूवात झाली. दहावीची परीक्षा दिलेल्या 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांनी ते अर्ज भरले आहेत. त्यांना अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा आहे. उपसंचालक कार्यालयाने अजूनही महाविद्यालयांची कट-ऑफ लिस्ट जाहीर केलेली नाही. त्यामुळे मिळालेल्या गुणांच्या आधारे कोणते महाविद्यालय निवडायचे अशा संभ्रमात विद्यार्थी-पालक आहेत.

पहिल्या टप्प्यातील प्रवेश नोंदणी निकाल लागण्यापूर्वी सुरू होते आणि निकाल जाहीर होताच दुसर्या टप्प्याचे वेळापत्रक लागते. तेसुध्दा निकालाच्या दोन दिवसानंतरही जाहीर करण्यात आलेले नाही. परिणामी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

iit-stats