असंतोष थोपवणे कठीण होईल, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार नाही; एकनाथ खडसे यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप व शिंदे गटात असंतोष उफाळून येईल. या असंतोषाला रोखणे आणि त्याला तोंड देणे कठीण जाईल म्हणून विस्तार केला जात नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. लेवा पाटीदार समाजाच्या मेळाव्यासाठी ते कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारासह अनेक मुद्यांवर सरकारला घेरले.

सरकार स्थापन होत सात महिने झाले तरी अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. फक्त 18 मंत्री राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे राज्याच्या हिताचे योग्य निर्णय होत नाहीत, जनसंपर्क कमी पडतोय. सरकारमधील सर्वच आमदार मंत्रीमंडळात येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला घ्यावे हा पेच असल्याने विस्तार होत नाही. विस्तार झाल्यास असंतोष उफाळेल आणि त्याला तोंड देण कठीण जाईल म्हणून विस्तार लांबणीवर पडल्याचे खडसे यांनी सांगितले.

‘सी’ सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 40 जागा मिळतील असा दावा करण्यात येत आहे. याबाबत बोलताना खडसे यांनी हा सर्व्हे सद्य परिस्थितीवर आधारित असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झाले. अलीकडे राज्यात महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आहेत इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जातात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महाराष्ट्रावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय. एकंदरीत सर्व स्थिती पाहता सर्वसामान्य माणूस प्रत्यक्ष स्थिती अनुभवतोय त्यामुळे या सरकारचा विरोधात तो मतदान करेल अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली.