
सामना प्रतिनिधी । मुंबई
घरगुती सिलिंडरवर देण्यात येणारा सबसिडी योजनेत कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयातर्फे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी बघता घरगुती सिलेंडरचे दर कमी होण्याची शक्यताही वर्तवली आहे.
एलपीजी सिलेंडरवरील सबसिडी आता बंद करण्यात येणार असून ती थेट पेट्रोलियम कंपन्यांना दिली जाणार आहे, अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने वस्तुस्थिती स्पष्ट करीत गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याचे सांगितले. तसेच सबसिडीच्या हस्तांतरण योजनेतही कोणताच बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले.
23 कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना सबसिडी
एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शनची माहिती मिळवणे तसेच खऱ्या गरजूंपर्यंत सबसिडी पोचवणे हे पहल योजनेचे उद्दिष्टय़ आहे. सध्या देशात 23 कोटीपेक्षा अधिक एलपीजी ग्राहकांना सबसिडी मिळत आहे नोव्हेंबर 20014 पासून बँके खात्यात थेट 94500 कोटींची सबसिडी देण्यात आली आहे, असेही पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले.


























































