शिक्षण विभागात समन्वय नाही; शाळा सुरू होण्यावरून यंदाही गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होणार कधी, यावरून यंदाही शालेय शिक्षण विभागात समन्वय नसल्याचे उघड झाले आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विदर्भवगळता राज्यातील शाळा 15 जून तर विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू होतील असे मंगळवारी सांगितले, मात्र राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालकांनी यापूर्वीच शैक्षणिक वर्ष 2023-24 चे नियोजन जाहीर केले आहे. त्यानुसार विदर्भवगळता राज्यातील शाळा 12 जून तर विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू होतील, असे स्पष्ट केले आहे. या दोन वेगवेगळय़ा निर्णयांमुळे राज्यातील शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार, उन्हाळी सुट्टी किती तारखेपर्यंत असणार, याबद्दल पालकांमध्ये आता संभ्रम निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी 3 एप्रिल रोजी राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी व नव्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन याबाबतचे नियोजन जाहीर केले. यात विदर्भवगळता इतर जिह्यांतील शाळांना 2 मे ते 11 जूनदरम्यान उन्हाळी सुट्टी देऊन 12 जूनपासून शाळा सुरू कराव्यात असे म्हटले आहे, मात्र शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी शाळा सुरू होण्याच्या नव्या तारखा जाहीर केल्याने पालकांसह शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्येही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्टीत अनेक पालक आणि शिक्षकही मूळ गावी जातात. शाळा कधी सुरू होणार यानुसार पालक शहरात परतण्याचे नियोजन करीत असतात. मात्र शिक्षण विभागाने सुट्टीबाबत निर्माण केलेल्या गोंधळामुळे पालकांचे सुट्टीचे नियोजन कोलमडणार आहे.