नागपूर विद्यापीठातून ‘डी.लिट’, ‘डी.एसस्सी’ची प्रक्रियाच ‘डिलीट’ होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून येत्या काळात ‘डी.लिट’, ‘डी.एसस्सी’ची प्रक्रियाच ‘डिलीट’ होणार आहे. ही प्रक्रिया केवळ ‘डी.लिट’, ‘डी.एसस्सी’चे संशोधन करणाऱ्यांना लागू होणार आहे. नवीन विद्यापीठ कायद्यामध्ये या दोन्ही पदव्यांविषयी कुठलीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे या पदव्या बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे येत्या काळात फक्त मानद उपाधीच दिली जाणार आहे.

विशेष म्हणजे कायद्याच्या नवीन अध्यादेशानुसार दोन पेक्षा अधिक मानद उपाधी देवू नये असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, संशोधन करणाऱ्यांना ‘डी.लिट’, ‘डी.एसस्सी’ द्यावी अशी कुठलीही तरतूद नाही. मागील काळात पीएचडी मिळविणाऱ्यांचे मोठे पीक आले होते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंदर्भात कठोर नियमावली तयार केली होती. त्याचा परिणाम म्हणून विद्यापीठातील पीएचडी धारकांची काहीसी संख्या कमी झाली नाही. मात्र, आता नवीन विद्यापीठ कायद्यानुसार ‘डी.लिट’ आणि ‘डी.एसस्सी’ या पदव्या देण्यासंदर्भात कुठलीही तरतूद केलेली नाही. विशेष म्हणजे पीएचडी झालेले संशोधक हे त्याच विषयामध्ये आणखी काही विशेष संशोधन करून ‘डी.लिट’, ‘डी.एसस्सी’ पदवीसाठी विद्यापीठाकडे अर्ज करतात. त्यानुसार त्याची तपासणी करून या पदव्या देण्यात येतात. मात्र विद्यापीठ कायद्यानेच याला बंधने घातल्याने नागपूर विद्यापीठ लवकरच त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे यापुढे केवळ समाजामध्ये काहीतरी विशेष कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींनाच विद्यापीठ मानद उपाधी म्हणून ‘डी.लिट’, ‘डी.एसस्सी’ देणार आहे.