यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही! भरत जाधव संतापले, नाटय़गृहाच्या अवस्थेवरूनच ‘तू तू मी मी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाटय़गृहातील कुचकामी वातानुकूलित यंत्रणा, भंगारात गेलेली साऊंड सिस्टम यावरून शनिवारी रात्री नाटय़गृहात ‘तू तू मी मी’ झाल्याचे पाहायला मिळाले. ‘‘यापुढे रत्नागिरीत प्रयोगच करणार नाही,’’ असे अभिनेता भरत जाधव यांनी सांगताना नाटय़गृहाच्या दयनीय अवस्थेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. याप्रकरणानंतर तरी नगरपरिषद आणि प्रशासक जागे होणार की, एसी केबीनमध्ये बसून नाटय़गृह दुरुस्तीच्या कोटय़वधी रुपयांच्या निधीवर फक्त ‘सही रे सही’ करणार का? असा संतप्त सवाल रत्नागिरीकर करत आहेत.

शनिवारच्या प्रयोगानंतर पुन्हा एकदा रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाटय़गृहातील प्रश्न ऐरणीवर आले आहेत. हजारो रुपये भाडे आकारूनही वातानुकूलित यंत्रणा सुरू नसल्याने नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. साऊंड सिस्टमचा प्रश्न अनेक वर्षे तसाच पडून आहे. दरवर्षी दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च होतो तो जातो कुठे? हा प्रश्न निर्माण होत आहे.

नाटय़गृह वडापवाल्यांचा अड्डा

शनिवारी रात्री दहा वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाटय़गृहात ‘तू तू मी मी’चा प्रयोग होता. प्रयोगाला पहिला फटका बसला तो बेकायदेशीर पार्किंगचा. नाटय़गृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर वडापच्या गाडय़ा बेकायदेशीरपणे उभ्या असतात. नाटय़गृहाकडे येणारा रस्ता हा वडापच्या गाडय़ांचा वाहनतळ झाला आहे. पोलीस किंवा आरटीओंना या बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या वडापच्या गाडय़ा कधीही दिसत नाहीत. शनिवारी रात्री वडापच्या गाडय़ांमुळे नाटक कंपनीची नेपथ्याचे सामान घेऊन येणारी गाडी रस्त्यात अडकली. गाडी नाटय़गृहात यायला उशीर झाल्याने प्रयोगाला उशीर झाला. दहा वाजून गेले तरी प्रयोग सुरू न झाल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

एसी असूनही फुटला घाम

शनिवाराचा ‘तू तू मी मी’चा प्रयोग वातानुकूलित नाटय़गृहात होता. 500, 400 आणि 300 रुपयांची तिकिटे काढून प्रेक्षक नाटक पाहायला आले होते. प्रयोग सुरू होताच घामाच्या धारा वाहू लागल्या. नाटकातील प्रमुख अभिनेते भरत जाधव यांनाही नाटय़गृहातील कुचकामी वातानुकूलित यंत्रणेचा फटका बसला. वातानुकूलित यंत्रणा धड काम करत नसल्याने प्रेक्षक आणि कलाकार घामाघूम झाले. एसी सुरू आहे की नाही, याबाबत काही प्रेक्षकांनी आवाजही उठवला. प्रचंड गर्मीमुळे भरत जाधव संतापले.   ‘‘असे नाटय़गृह असेल तर यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही,’’ असे त्यांनी संतापून सांगितले.

नादुरुस्त साऊंड सिस्टम

नाटय़गृहाची साऊंड सिस्टम यापूर्वीच भंगारात गेली आहे. साऊंड सिस्टम दुरुस्तीवर किती खर्च केला गेला आहे हा संशोधनाचा विषय असून त्याचाही आवाज दाबला जातो. काल प्रयोग सुरू होताच आवाज येत नसल्याने प्रेक्षक निराश झाले. आवाज कमी येत असल्याबाबत प्रेक्षकांमधून सूर उमटू लागले. साऊंड सिस्टमबाबत काही प्रेक्षकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.