कोरोनाचे केंद्र असलेल्या वूहानमध्ये सध्या कशी आहे परिस्थिती… वाचा सविस्तर

2316

जगभरात कोरोनाचा मुकाबला करण्यात येत आहे. कोरोनावर कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने पर्यायी औषधे वापरून त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संक्रमणाचे केंद्र असलेल्या आणि हा रोग पसरण्यास सुरुवात झालेल्या चीनच्या वूहान शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे आता या शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोरोनाचे केंद्र असलेले वूहान शहर 23 जानेवारीपासून लॉक डाऊन करण्यात आले होते. लॉक डाऊन झाल्यामुळे 1.1 कोटी नागरिक घरातच बंद झाले होते. त्यामुळे सुमारे दोन महिने लॉक डाऊनमध्ये काढल्यानंतर या शहरातील नागरिकांना दिलास देण्यात येत आहे. या शहरात कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नसल्याने जनतेला कामावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सूरळीत करण्याचे प्रयत्न होत आहेत. वूहानमध्ये सलग पाचव्या दिवशी कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे आता या शहरातील निर्बंध हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वूहान शहरासह साडेपाच कोटी लोकसंख्या असणाऱ्या हुबई प्रांतात 23 जानेवारीपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते आणि त्याची अंमलबजावणी कठोरतेने करण्यात आली. आता लोकांना कामावर जाण्याची परवानगी देण्यात आली असली आणि सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही, या शहारात नव्या संक्रमणाची किंवा नवा रुग्ण आढळण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनमध्य कोरनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. मात्र, परदेशातून आलेल्या 39 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे चीनमध्ये 3270 जणांचा मृत्यू झाला आहे. परदेशातून आलेल्या संक्रमित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात चीनमध्येसलग तीन दिवस कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, त्यानंतर काही रुग्ण आढळून आले.

चीनला हिंदुस्थानने मदतीचा प्रस्ताव दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र पाठवून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. हिंदुस्थानने 26 फेब्रुवारीला 15 हजार किलो चिकित्सा उपकरणे, मास्क आणि ग्लोव्ज चीनच्या वूहानमध्ये पाठवले होते. हिंदुस्थानच्या या मदतीसाठी चीनने हिंदुस्थानेच आभार मानले आहेत. तसेच वूहानमधील अनुभव आणि रोग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती हिंदुस्थानला देण्यात येणार आहे. त्याचा हिंदुस्थानला कोरोना रोखण्यासाठी निश्चितच उपयोग होईल, असे चीनने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या