कोरोना रुग्णांच्या अस्थी न्यायला कोणी आले नाही, समाजसेवकाने केले 200 अस्थी कलशांचे नदीत विसर्जन

गेल्यावर्षीपासून जगभरात कोरोना महामारीचे संकट उभे ठाकले आहे. या काळात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अग्निसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी स्मशानाताच राहिल्या होत्या. त्या अस्थींचे विसर्जन करायला कोणीच नातेवाईक आले नाहीत. म्हणून एका समाजसेवकाने हिंदु धर्म पद्धतीने धार्मिक विधी करून त्या अस्थींचे नदीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.

छत्तीगढमधील रायपूर जिल्ह्यातील मारवाडी स्मशानात 200 पेक्षा जास्त मत्यू पावलेल्या कोरोना रुग्णांच्या अस्थि ठेवण्यात आल्या होत्या. बरेच महिने उलटून गेले तरी या अस्थिंचे विसर्जन करण्याकरिता मृत व्यक्तिंचे नातेवाईक, कुटुंबीय आले ऩाहीत. म्हणून येथील समाजसेवक विनोद तिवारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली. कोरोना रुग्णांवर अग्निसंस्कार झाल्यानंतर त्यांचे अस्थी कलश मारवाडी स्मशानभूमीतील एका कपाटात ठेवण्यात आले होते. हे सर्व अस्थी कलश महादेव घाट नदीपात्राजवळ रांगेने ठेवले. गुरुजींनी वेदमंत्रांचे पठण करून मृतांच्या आत्म्याला शांती लाभावी याकरिता प्रार्थना केली आणि त्यानंतर सर्व अस्थि कलशांचे नदीत विसर्जन केले. मंगळवारी सकाळी हा विधी करण्यात आला.

याबाबत समाजसेवक विनोद तिवारी यांनी सांगितले की, एका परिचयातल्या व्यक्तिच्या अंत्ययात्रेकरिता मारवाडी स्मशानभूमीत गेले होतो. तेव्हा मृत कोरोनाग्रस्तांच्या अस्थिंविषयी कळले. त्यांच्यावर प्रशासनाकडून अग्निसंस्कार करण्यात आले होते. काही जणांच्या अस्थि त्यांचे नातेवाईक घेऊन गेले होते, पण बहुतांश जणांचे अस्थी कलश बरेच महिने उलटून गेले तरी स्मशानातल्या कपाटात आहेत, हे कळल्यावर जिल्हाधिकारी सौरभ कुमार यांची भेट घेतली. त्यांना अस्थिंच्या विसर्जनाबाबत पत्र देऊन त्यांची परवानगी घेतली. त्यानंतर इतर समाजसेवक तरुणांच्या मदतीने नदीकिनारी अस्थि कलशांचे पूजन आणि प्रार्थना करून ते नदीपात्रात सोडले. यावेळी नदीकिनारी उपस्थित असलेल्या लोकांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली.

आपली प्रतिक्रिया द्या