
महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करण्याची भाषा होऊ लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल आज संताप व्यक्त केला. विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्र विदर्भाचा. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ शकत नाही… कोणाची हिंमत आहे विदर्भ तोडण्याची, असे ठणकावून सांगतानाच, महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरच्या विधान भवन आवारातील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळय़ा विदर्भाचा मुद्दा उकरून काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा भाजपची भूमिका वेगळय़ा विदर्भाच्या बाजूची असल्याचे म्हटले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. वेगळय़ा विदर्भाची मागणी मान्यच होऊ शकत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागलेत त्यांची भूमिका यावर काय आहे? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावरही निशाणा साधला. सरकारने जाहीर केले पाहिजे की, महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिता की तुकडे पाडू इच्छिता? कारण हा महाराष्ट्राच्या मुळावर आघात करण्याचा विषय आहे. जो कुणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करतो तो महाराष्ट्राचा नाही. त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनात विदर्भासाठी काय प्रश्न मांडले, हे वेगळय़ा विदर्भाची मागणी करणाऱयांनी स्पष्ट करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मंत्र्यांना विदर्भावर प्रश्न विचारा
विदर्भाच्या मुद्दय़ांवर अधिवेशनात चर्चा होत नाही. त्याबद्दल प्रसारमाध्यमांनी मंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिला.
लोढा टाईट होऊन बोलले असतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत भाजपचा महापौर होईल तेव्हा माझी कॉलर टाईट होईल असे वक्तव्य भाजपचे नेते व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, लोढा कदाचित टाईट होऊन तसे बोलले असतील, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.
सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत?
अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी हेलिकॉप्टरने परत जातील. त्यांची हेलिकॉप्टर बुक झाली असतील. बरोबर त्यांच्या बॅगा असतील आणि त्यात आनंदाचा शिधाही असेल. नागपूरला उतरल्यानंतर माझी बॅग तपासली गेली मग सत्ताधाऱयांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
घुसखोरी होत असेल तर देशाच्या सीमा सील कराव्या
महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. घुसखोरी होत असेल तर केंद्र सरकारने देशाच्या सीमा सील केल्या पाहिजेत, पण त्यांना देशाचे काही पडलेले नाही कारण पंतप्रधान आणि गृहमंत्री हे देशाचे नाहीत तर भाजपचे आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
फक्त निवडणुकांसाठी घोषणा, विदर्भासाठी काहीच नाही
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, विदर्भाचे प्रश्न आणि व्यथा मांडता याव्यात म्हणून हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये घेण्याचा प्रघात आहे. पण अधिवेशनात विदर्भाच्या विषयावर किती काळ चर्चा झाली? सरकारकडून फक्त महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन घोषणा केल्या गेल्या, पण विदर्भासाठी काय केले, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
महायुती महापालिकेत एकत्र लढेल असे वाटत नाही
महायुती महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा विचार करतेय असे पत्रकारांनी यावेळी सांगितले. त्यावर, महायुती एकत्र गेल्या वेळी होती, पण आता त्यांनी एकमेकांवरच धाडी टाकल्या. त्यामुळे महायुती एकत्र लढेल असे वाटत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री निधीचे लाभार्थी शोधायला हवेत
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 106 कोटी रुपये जमा झाले होते. त्यातील फक्त 75 लाख रुपयेच खर्च करण्यात आले. अशी या सरकारची केविलवाणी दानत आहे, असे सरकार शेतकऱयाला काय मदत करणार? सगळी थट्टा सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री नेमके कोणाला सहाय्य करताहेत, सहाय्यता निधीतील नेमका लाभार्थी कोण याचा शोध घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.
अधिवेशन संपण्यापूर्वी विरोधी पक्षनेता नेमा!
हिवाळी अधिवेशनाला दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता मिळावा अशी आमची अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, शिवसेना व महाविकास आघाडी जनतेचे प्रश्न मांडत आहे, ते आमचे कर्तव्यच आहे, परंतु विरोधी पक्षनेत्याला एक दर्जा असतो, त्याला एक मान असतो, तो प्रशासनाशी, अधिकाऱयांशी अधिकाराने बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो. मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारला जाब विचारू शकतो, मात्र हे सरकार विरोधी पक्षनेताच नको या विचारांचे दिसतेय, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो!
उद्धव ठाकरे यांचे हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवन आवारात आगमन झाले तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरायवल अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी जोरदार पलटवार केला. ‘गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, आणि गांडुळाने फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो. हे कुणीतरी त्यांना सांगा,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदेंचा नामोल्लेख न करता चपराक लगावली. शिंदे गटाचे अनेक मंत्री महत्वाच्या कामकाजावेळी सभागृहात उपस्थित नसतात असा सर्वच सदस्यांचा अनुभव आहे. त्यामुळे अनेकदा कामकाजात व्यत्यय येतो. कामकाज पुढे ढकलावे लागते. मात्र चोराच्या उलटय़ा बोंबा या म्हणीप्रमाणे शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे विधानसभा अधिवेशनाला अनुपस्थित राहतात असा आरोप केला जातो. आज उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांना तशीच चपखल प्रतिक्रिया देऊन गपगार केले.



























































