
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि त्याची पत्नी लॉरा हेमेलिन उर्फ आयेशाला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यावेळी न्यायालयाने पोलिसांवरही कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढले. पोलिसांनी नियमांचे पालन केले नाही असे न्यायालयाने म्हटले.
कुर्ला पोलिसांनी गेल्या आठवड्यात फराझ मलिक आणि त्याची पत्नी लॉरा हेमेलिन उर्फ आयेशा यांच्याविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोघांनी अटकेच्या भीतीने सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी या दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर करून दिलासा दिला. यावेळी न्यायालयाने पोलिसांनाही झापले.
अटकेचे दूरगामी परिणाम होतात. यामुळे केवळ अटक केलेल्या व्यक्तीलाच नाही, तर त्याच्या कुटुंबियांनाही आयुष्यभर याचा सामना करावा लागतो, असे अटकपूर्व जामीन मंदूर करताना दिलेल्या आदेशामध्ये न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी म्हटले. सकृतदर्शनी फराझ मलिक आणि त्याची पत्नी लॉरा हेमेलिन उर्फ आयेशा यांनी व्हिसा मुदतवाढीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. तसेच जामीन अर्ज फेटाळण्यासाठी तपास अधिकाऱ्याने मांडलेले कोणतेही कारण समाधानकारक नव्हते, असेही न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी म्हटले.
तपास अधिकाऱ्याने आधीच मत तयार करून दोघांना अटक करण्याचा विचार केला आणि त्यांना न्यायालयाकडून दाम्पत्याचा पोलीस रिमांड हवा आहे. तपास अधिकारी या निष्कर्षावर कसे आणि का पोहोचले हे स्पष्ट करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही कारण नाही. यावरून तपास अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचे दिसतेय, असेही न्यायाधीश म्हणाले.
काय आहे प्रकरण?
पर्यटक व्हिसाचे दीर्घकालीन व्हिसामध्ये रूपांतर करण्यासाठी कथित बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप फराझ आणि त्याची फ्रेंच पत्नी लॉरा हेमेलिन उर्फ आयेशा यांच्यावर ठेवण्यात आला होता. पोलिसांनी त्यांच्याविरोधात कलम 420, 465, 468, 471, 34 IPC नुसार गुन्हा दाखल केला.
























































