
सामना प्रतिनिधी । घाटनांद्रा
घाटनांद्रा परिसरात दहा-पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सर्वांनीच खरिपाची पेरणी केली. सध्या पिकाची उगवण झाली. मात्र पाच-सहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने कोवळी पिके सुकू लागली आहेत.
थोड्याशा पावसावर खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांना आता दमदार पावसाची आवश्यकता असून, परिसरातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. सातआठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वरच्या पाण्यावर अवलंबून असलेली कोवळी पिके धोक्यात आली आहे. घाटनांद्रा परिसरात सुरुवातीला दोन पाऊस चांगले झाले. हवामान खात्याने यंदा १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने घाटनांद्रासह परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी कपाशी, मका, भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची लागवड केली. मात्र, पेरणी झाल्यानंतर या परिसरात एकही दमदार पाऊस न झाल्याने पिके धोक्यात आली आहेत. कपाशी व मका पिकात तूट निर्माण झाली आहे. दरम्यान, उधार उसनवार करून लागवडीसाठी खर्च केला. आता शेतीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे.
परिसरात पाऊस गायब होऊन कडक ऊन पडले आहे. जमिनीत पाणीच नसल्यामुळे कोवळी पिके उन्हामुळे करपून जात असून सुकू लागली आहेत. अजून दोन-तीन दिवसांत पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

































































