
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष मुंबईतील दोन कोर्टांकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा कट रचणे आणि चिथावणी देणे या आरोपांखाली पोलीस कोठडीत असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात उभे करण्यात आले. तर दुसरीकडे ‘विक्रांत बचाव’ निधीच्या घोटाळय़ातील ‘भूमिगत’ किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील यांनी सत्र न्यायालयात वकिलामार्फत धाव घेतली होती. सदावर्ते यांना जेलमधील मुक्काम वाढवून नको होता. तर सोमय्या बाप–बेटय़ाला अटक टाळायची होती. मात्र दोन्ही न्यायालयांनी दोघांनाही दणका दिला आणि सदावर्तेंचा जेलमधील मुक्काम 13 एप्रिलपर्यंत वाढवला, तर किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. नील सोमय्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या घरावर झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेच असल्याचे समोर येत आहे. या हल्ल्याचा कट 6 मार्च रोजी रचला गेला. हल्ल्यापूर्वी सदावर्ते यांनी नागपूरला व्हॉट्सअॅप कॉल केले होते. हल्ल्याचे कव्हरेज करण्यासाठी सदावर्ते हे त्या दिवशी सकाळपासूनच पत्रकारांच्या सतत संपर्कात होते असे चौकशीत उघड झाले आहे. हल्ल्यापूर्वी चार जणांनी पवार यांच्या घराची रेकी केली होती. अशा अनेक गोष्टी पोलीस चौकशीत उघड झाल्याची माहिती सरकारी वकिलांनी आज न्यायालयात दिली.
गुणरत्न सदावर्ते यांना आज गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलीस चौकशीतून बऱयाच गंभीर गोष्टी बाहेर आल्याची माहिती न्यायालयाला दिली. नागपूरमधील एक व्यक्ती आणि ‘एमजेटी’ नावाच्या मराठी वृत्तवाहिनीचा पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी हा हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते यांच्या सातत्याने संपर्कात होता. त्याने आंदोलकांमध्ये असंतोष पसरेल असे व्हिडियो यूटय़ूबवर अपलोड केले होते. परंतु चौकशी सुरू झाल्यानंतर त्यातील काही व्हिडीयो डिलिट केले आहेत. त्या दोघांमध्ये व्हॉट्सअॅप कॉल झाले. दोघांनी सकाळी साडेदहा वाजल्यापासून हल्ल्यासंदर्भात चॅटिंगही केली, अशी माहिती अॅड. घरत यांनी न्यायालयात दिली.
हल्ल्याचे नागपूर कनेक्शन
सदावर्ते यांच्या मोबाईल फोनचे सीडीआर रेकॉर्डस् पोलिसांनी तपासले आहेत. त्यात या हल्ल्याचे नागपूर कनेक्शन समोर आले आहे. सदावर्ते यांनी घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूरमध्ये एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप कॉल केला होता असे सांगताना अॅड. घरत यांनी त्या व्यक्तीचे नाव तूर्त उघड करता येऊ शकत नाही असे सांगितले. त्या व्यक्तीच्या फोननंतरच सगळी जमवाजमव सुरू झाली आणि नंतर त्याच व्यक्तीने ‘पत्रकार पाठवा’ असा मेसेजही केला होता. त्या व्यक्तीशी सदावर्तेंचे काय बोलणे झाले त्याचा तपास पोलीस करत आहेत. त्यानंतर दुपारी 2.42 वाजल्यापासून काही पत्रकारांना अभिषेक पाटील नावाच्या एसटी कर्मचाऱयाने फोन केले होते. असा हा अत्यंत सुनियोजित कट होता, अशी माहिती अॅड. घरत यांनी न्यायालयाला दिली.
एसटी कर्मचाऱ्यांकडून कोटय़वधींची जमवाजमव
सदावर्ते यांनी प्रत्येक कर्मचाऱयाकडून 530 रुपये घेतले. जवळपास 1 कोटी 55 लाखांहून अधिक रक्कम त्यांनी गोळा केली. ते पैसे कोणी आणि कसे जमा केले तसेच त्यांचा वापर कसा केला, गेले सहा महिने त्यांना पैशांचा पुरवठा कुठून होत होता त्याचाही तपास करायचा आहे. या पैशात इतरही वाटेकरी आहेत, अशी माहिती अॅड. घरत यांनी दिली.
सदावर्ते योग्य सहकार्य करीत नाहीत
सदावर्ते पोलीसांना योग्य ते सहकार्य करत नाहीत. त्यांनी मोबाईलचे सीमकार्ड नष्ट केले आहेत. मोबाईलचा आयएमईआय नंबर सांगण्यासही ते तयार नाहीत. ते पोलिसांना योग्य सहकार्य करत नसल्याने या प्रकरणाची कसून चौकशी होणे आवश्यक आहे, असे अॅड. घरत यांनी सांगितले.
सातारा पोलीसही सदावर्तेना उचलणार
छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुह्यासंदर्भात सातारा पोलीसही सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईत आले आहेत.
13 एप्रिलपर्यंत कोठडीत
सरकारी वकील प्रदीप घरत आणि सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला. हा हल्ला आणि तत्पूर्वी घडलेल्या घटना यांच्याबद्दल अनेक गंभीर खुलासे अॅड. घरत यांनी न्यायालयात केले. या कटातील आरोपींची समोरासमोर चौकशी करायची असल्याने 11 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. एसटी कर्मचाऱयांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हल्ल्यापूर्वी ‘या’ चौघांनी केली पवारांच्या घराची रेकी
हल्ल्यापूर्वी चार जणांनी शरद पवार यांच्या घराची रेकी केली होती, अशी माहितीही अॅड. घरत यांनी दिली. त्या चौघांना अटक करण्यात आली असून अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, मोहम्मद ताजुद्दीन आणि सविता पवार अशी त्यांची नावे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे मोबाईल पह्न जप्त करण्यात आले आहेत. एक आरोपी फरार आहे. हल्ल्यापूर्वी ‘सावधान शरद…सावधान शरद…’ असे बॅनर्स तयार करण्यात आले होते. त्यावर सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांचे पह्टो होते. ते बॅनर्स तयार झाल्याचे व्हॉट्सअॅप मेसेज मोहम्मद ताजुद्दीन याच्या मोबाईलवरून गेले होते, असा दावाही अॅड. घरत यांनी न्यायालयात केला.
ते आंदोलन होते, गुन्हा काय तो सांगा! सदावर्तेंच्या वकिलांचा युक्तिवाद
गुणरत्न सदावर्ते यांचे वकील अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी सरकारी वकिलांचे आरोप फेटाळून लावले. शरद पवार यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेले ते आंदोलन होते. त्यांचा गुन्हा काय तो सांगा, असा दावा अॅड. कुलकर्णी यांनी केला. जे पैसे गोळा करण्यात आले त्याबाबत एका तरी कर्मचाऱयाने तक्रार केली आहे का, असा सवाल त्यांनी केला. प्रत्येकी 530 रुपये जमा केले गेले आणि त्याची पावती देण्यात आली होती असा दावाही त्यांनी केला. पोलिसांना आधीच माहिती होती तर त्यांनी बंदोबस्त का वाढवला नाही? आंदोलन असल्याने पत्रकारांना बोलवले त्यात काय नुकसान झाले? आंदोलकांनी गेटवर चपला फेकल्या त्यात कुणी जखमी झाले का? असे प्रश्न त्यांनी विचारले. केवळ सिल्व्हर ओकवर चप्पल फेकली म्हणूनच गुन्हा दाखल केला गेला असा आरोपही त्यांनी केला. पत्रकारांशी पह्नवर बोलणे झाले ते मोर्चाबाबत होते आणि पत्रकारांनीही स्वतःहून त्या दिवशी फोन केले होते असे कुलकर्णी म्हणाले. अॅड. कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला की, घटनेवेळी सदावर्ते त्याठिकाणी नव्हते तसेच पोलिसांनी केलेले आरोप चुकीचे आहेत ज्या फोनबाबत आणि सिमकार्डबाबत पोलीस बोलत आहेत त्याची वॅलिडीटी 31 मार्चपर्यंत होती. त्या दिवसांपर्यंतच हा फोन वापरण्यात आला. तसेच सदावर्ते पोलीसांना तपासात योग्य ते सहकार्य करत असल्याचा दावा वकिलांनी केला.
सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्याविरोधात अकोल्यात गुन्हा दाखल
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी अॅड. जयश्री पाटील व अन्य दोनजणांविरुद्ध अकोला शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱयांकडून प्रत्येकी 300 व 500 रुपये असे राज्यभरातून 70 हजार कर्मचाऱयांकडून जवळपास 3 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे.



























































