सर्व शिक्षा अभियानाची ऐशीतैशी,शाळा सुरू झाली तरीही विद्यार्थ्यांना गणवेश नाही

13

सामना ऑनलाईन, धुळे

कोणतीही मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. परंतु यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना होत आला तरीदेखील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. गणवेशापोटी शिक्षण विभागाला शासनाकडून 5 कोटी 27 लाख रुपये अपेक्षित आहेत. निधी मिळताच विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध होतील अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी सांगितले.

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके आणि गणवेश दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. मुले शाळेत येतात. शिवाय पटसंख्या वाढल्यामुळे गळती रोखली जाते. परंतु यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना झाला तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. एका गणवेशासाठी शासनाकडून तीनशे रुपये दिले जातात. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशांसाठी सहाशे रुपये दिले जातात. शिक्षण घेणाऱया पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसुचित जाती, जमाती आणि दारिद्रय़रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. महिना होत आला तरीही विद्यार्थ्यांना या गणवेशाची प्रतीक्षाच आहे.

‘विद्यार्थ्यांना गणवेश देता यावा म्हणून शासनाकडे 5 कोटी 27 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. शासन दरबारी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पैसा उपलब्ध होताच विद्यार्थ्यांच्या गणवेशाची सोय होईल.’- मनीष पवार, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग

आपली प्रतिक्रिया द्या