
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शेतीच्या विषयावर आणि थोडी राजकारणावर चर्चा झाली. मात्र सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. सध्या आकाशात ढगच आलेले नाहीत. त्यामुळे आताच सारे काही सांगणे शक्य नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. कडू यांनी मिंधे सरकारच्या बाबतीतील नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर उलटसुलट चर्चा आता रंगल्या आहेत.
शरद पवार यांनी आज प्रहार संघटनेचे अध्यक्ष-आमदार कडू यांच्या कुरळ पूर्णा येथील निवासस्थानी भेट दिली. चहापानादरम्यान त्यांच्यात चर्चा झाली. याविषयी कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पवार यांच्यासोबत फारशी राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही शेतीच्या विषयावर बोललो. राजकीय चर्चेबद्दल विचारले असता कडू म्हणाले, महाविकास आघाडीत प्रवेश करण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महायुतीसोबत राहू, असे आधीच आपण स्पष्ट केले आहे. परंतु पुढील काळात काय घडामोडी होतात, हे आताच सांगता येणार नाही. सर्वच राजकीय बाबी उघड करायच्या नसतात, असे ते म्हणाले.
शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट
ज्या मुलांवरचे आधाराचे छत्र हरपले आहे अशा शेकडो अनाथ – दिव्यांग मुलांना ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी आधार दिला आणि त्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. अशा थोर समाजसेवकाच्या अमरावती जिह्यातील वझ्झर येथील आश्रमाला शरद पवार यांनी सदिच्छा भेट दिली. पवार यांनी पापळकर यांच्याकडून त्यांच्या निःस्वार्थ कार्याची सविस्तर माहिती जाणून घेतली. याप्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेदेखील उपस्थित होते.






























































