पदासाठी लाचारी, दबावतंत्र माझ्या रक्तात नाही – पंकजा मुंडे

1221
pankaja-munde

माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करून ज्या काही बातम्या चालकिल्या गेल्या त्यामुळे मी व्यथित आहे. मी पदासाठी कधी लाचारी केली नाही का कधी दबावतंत्राचा वापरही केला नाही. माझ्या ते रक्तातच नाही. पण ज्या बातम्या चालविल्या जात आहेत त्यामुळे मी व्यथित आहे. मला कोणते पद मिळूच नये यासाठी तर हे प्रकार करण्यात येत नाहीत ना अशी शंका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केली.

पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर त्या भाजप सोडणार अशी जोरदार राजकीय वर्तुळात सुरू झाली. पंकजा मुंडे या दबावतंत्र अवलंबित असल्याच्याही बातम्या पसरल्या. याबाबत अखेर पंकजा मुंडे यांनीच पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, 2014 सालच्या निवडणुकीआधीदेखील मी मुख्यमंत्री बनणार अशा बातम्या पसरविल्या गेल्या. त्यानंतर मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा बातम्या पेरण्यात आल्या. आतादेखील माझ्या फेसबुक पोस्टवरून विपर्यस्त बातम्या सुरू आहेत. माझे वडील गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी मोठे कार्य केले. मीदेखील अगदी साध्या पदापासून ते आमदार, मंत्री अशी अनेक पदे भूषविली. आताच्या निवडणुकीतही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या, पण अशा बातम्या चालल्याने निश्चितच दुःख होते. सध्या मी आत्मचिंतन करत आहे. मला त्यासाठी थोडा वेळ हवा आहे. 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर माझ्या सर्व भावना मी व्यक्त करणारच आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

विनोद तावडे यांच्याकडूनही स्पष्टीकरण

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्व अफवा असून पंकजा कधीच भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मंगळवारी पंकजा यांच्या रॉयलस्टोन या निवासस्थानी भाजपचे नेते विनोद  तावडे, प्रा. राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. विपर्यस्त बातम्यांमुळे पंकजा व्यथित असल्याची प्रतिक्रिया तावडे व शिंदे यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या