मालाची ऑर्डर न पाठविता पुण्यातील कंपनीला 3 कोटींचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हँडग्लोजच्या मालाची ऑर्डर न पाठविता एका कंपनी मालकीणीला तब्बल 3 कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2020 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडली. याप्रकरणी कंपनी मालकीणीने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार महिलेची नऱ्हे परिसरात पॅकस्पेस इंटरप्रायझेस कंपनी आहे. त्यांनी न्यूयार्कमधील पॅकेजिंग आयआय एलएलसी कंपनीकडे पेपरबॅग आणि हँडग्लोजची ऑर्डर दिली होती. त्यासाठी 6 कोटी रूपये कंपनीला दिले होते. मात्र, संबंधित कंपनीने पॅकस्पेस इंटरप्रायझेस कंपनीला फक्त पेपर बॅगचा माल पाठविला. उर्वरित हँडग्लोजची मागणी केली असता, न्यूयार्कमधील कंपनीने तक्रारदार मालकीणीला मालाची ऑर्डर समुद्रामार्गे पाठवित असल्याचे खोटे सांगून 3 कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी दिली.