
सर्बियाचा नोवाक जोकोविच, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव यांनी पुरुष गटात, तर महिला गटात कोको गॉफ व जेसिका पेगुला या अमेरिकन खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. सहाव्या मानांकित नोवाक जोकोविचने सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅक्डोनाल्डचा 6-3, 6-3, 6-3, असा धुव्वा उडविला. त्याने ही लढत एक तास 58 मिनिटांत जिंकली. गतउपविजेत्या तृतीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवने अमेरिकेच्या लर्नर टीएनचा एक तास 53 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत 6-3, 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या अभियानास प्रारंभ केला. अव्वल मानांकित यानिक सिनरने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या आर्थर रिडरक्नेचचा 6-4, 6-3, 7-5 असा पराभव करत सलग 15 वा ग्रँडस्लॅम विजय मिळविला. डोपिंगबद्दल तीन महिन्यांची बंदी भोगल्यानंतर हा सिनरचा दुसरा स्पर्धात्मक सामना होता. त्याने गेल्या वर्षी यूएस ओपन आणि या वर्षी सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. इटलीच्या या 23 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत तीन ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत.