
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले. आता याच फ्रेंचाइझीमधला आणखी एक चित्रपट ‘सिंघम अगेन’ येणार आहे. लवकरच त्याचे शूटिंग सुरू होणार आहे. ‘सिंघम अगेन’मधील मुख्य अभिनेत्रीची घोषणा नुकतीच रोहितने केली. अभिनेत्री दीपिका पदुकोण यामध्ये ‘लेडी सिंघम’ साकारणार असल्याचे त्याने जाहीर केले. ‘दरवेळी विचारलं जातं की लेडी सिंघम कधी येणार? तर आज मी तुम्हाला सांगतो की ‘सिंघम 3’ मध्ये लेडी सिंघम असेल आणि ती दीपिका पदुकोण आहे,’ असे रोहितने सांगितले. रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा चित्रपट नाताळला प्रदर्शित होणार आहे. ‘सर्कस’मधील ‘करंट लगा’ हे गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमात रोहितने ‘सिंघम अगेन’विषयी मोठी घोषणा केली.रोहित शेट्टी आणि दीपिकाने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता ‘सिंघम 3’च्या निमित्ताने हे दोघं पुन्हा एकत्र काम करणार आहेत. अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सिंघम अगेनच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.


























































