आता मिडल सिटसाठीही  थ्री पॉइंट ‘सुरक्षा बेल्ट’, नितीन गडकरी यांचे कार उत्पादकांना आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता वाहनाच्या मधल्या आसनांना थ्री पॉइंट सिट बेल्ट बसविण्याचे आदेश कार उत्पादकांना केंद्र सरकारने दिले आहेत. हा नियम मागच्या मिडल सिटवर बसणाऱया प्रवाशालाही बंधनकारक असेल असे केंंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी सांगितले.

मी कालच कार उत्पादकांना कारच्या पुढच्या दिशेला असणाऱ्या सर्व प्रवाशांच्या आसनांना थ्री पॉइंट सिट बेल्ट बसविणे बंधनकारक करण्याच्या फाईलवर सह्या केल्या आहेत, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांनी हा नियम नेमक्या कोणत्या तारखेपासून लागू होईल हे मात्र स्पष्ट केलेले नाही. सध्या कारच्या पुढच्या सिट आणि दोन मागच्या सिटला देशातील बहुतेक कार उत्पादक थ्री बेल्ट पुरवित आहेत. तर सेंट्रल किंवा पाठच्या मधल्या सिटला केवळ विमानाच्या आसनाप्रमाणे ‘टू पॉइंट’ सिट बेल्ट पुरविला जात आहे. गेल्याच आठवडय़ात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आठ पेक्षा जास्त प्रवासी क्षमता असणाऱया कार उत्पादकांना या वर्षाच्या ऑक्टोबरपासून मोटार वाहनात कमीत कमी सहा एअरबॅग पुरविणे बंधनकारक केले आहे.