
सामना ऑनलाईन, मुंबई
सामान्य प्रवाशांना माफक तिकीट दरात आरामदायी प्रवास करता यावा याकरिता एसटी महामंडळाने सुरू केलेल्या अत्याधुनिक अशा ‘शिवशाही’ बसेसचे अपघात कमी करण्यासाठी योजलेल्या उपायांना यश येत आहे. गेल्या दोन महिन्यांत अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून शिवशाही बस प्रवासासाठी अधिक सुरक्षित बनविण्याच्या महामंडळाच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे.
प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित बसेसना अलीकडे वारंवार अपघात होत होते. परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी याची तातडीने दखल घेत अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्याचे आदेश एसटी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महामंडळाने समिती नियुक्त करून अपघातांच्या कारणांचे विश्लेषण करून उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
अपघातात दोन महिन्यांत घट
गेल्या दोन महिन्यांत शिवशाही बसेसच्या अपघातात घट झाली असून एप्रिल ते ऑगस्ट 2018 दरम्यान दर एक लाख कि.मी. मागे स्वमालकीच्या शिवशाही बसेसचे अपघाताचे प्रमाण 0. 41 टक्के होते ते सप्टेंबर 2018 मध्ये 0.34 टक्के व ऑक्टोबर मध्ये 0.18 टक्क्यांपर्यंत घटले आहेत. तसेच खासगी शिवशाही बसचे प्रमाण जे एप्रिल ते ऑगस्ट 2018 दरम्यान दर एक लाख कि.मी मागे 0.34 टक्के होते ते सप्टेंबर 2018 मध्ये 0.28 टक्के व ऑक्टोबरमध्ये 0.21 टक्क्यांपर्यंत घटले आहे.
कर्मचाऱ्यांना बस कंपनीच्या तज्ञांकडून प्रशिक्षण
या बसेसच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. चालकांना विना अपघात बस चालविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. वाहनांची दुरुस्ती व देखभाल याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. घाट, रस्ता व वळणावर तज्ञ मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच थेट बसेस बनविणाऱ्या कंपनीच्या तज्ञांकडूनही प्रशिक्षण देण्यात आले.
































































