ब्रेकिंग : अशोक चव्हाणांना दिलासा, उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी अरूण डोंगरे यांनी फेटाळले आहेत. अर्जांच्या छाननीच्या दिवशी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. अपक्ष उमेदवार रविंद्र थोरात आणि शेख अफजलोद्दीन अजिमोद्दीन उर्फ शेख सर (बहुजन महापार्टी) यांनी घेतलेल्या आक्षेपांवर बुधवारी प्रदीर्घ युक्तीवाद झाला. यानंतर जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी निकाल राखून ठेवला होता. जिल्हाधीकाऱ्यांनी याबाबत बुधवारी रात्री 10.30 वाजता उशिरा निर्णय दिला.

काय आहे नक्की प्रकार?
खासदार अशोकचव्हाण यांच्या प्रतिज्ञापत्रात 2014 साली दाखल केलेल्या शपथपत्रात 1 कोटी 56 लाख 57 हजार, आणि 87 लाख रुपयांचे वेगवेगळे फंड दाखविले होते. मात्र यावेळी त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. याबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतला. तसेच भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चव्हाण कुटुंबीयांच्या गॅस एजन्सीचे उत्पन्न आपल्या शपथपत्रात दाखविले नसल्याबद्दल आक्षेप घेतला. वेगवेगळ्या फंडांच्या माध्यमातून 2014 साली दाखविलेली रक्कम या वर्षीच्या म्हणजे 2019 च्या शपथपत्रात गायब करण्यात आली आहे. नेमके या फंडाचे काय झाले, त्याचे विवरण अशोक चव्हाण यांनी दिले नसल्याचा आक्षेपही नोंदविण्यात आला.

बहुजन महापार्टीचे उमेदवार शेख अफलोद्दीन अजिमोद्दीन यांनी 2014 आणि 2019 च्या शपथपत्रात असलेली तफावत गंभीर असून, त्याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाही. सरळ सरळ ही फसवणूक असल्याचे म्हणत त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविला आहे. चव्हाण कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या वेगवेगळ्या एजन्सीच्या संदर्भात त्यातून मिळालेले उत्पन्न शपथपत्रात दाखल केले नाही, असा आक्षेप चिखलीकर यांच्या वतीने घेण्यात आला. त्यांच्या वकिलाने बुधवार सायंकाळपर्यंत वेगवेगळे पुरावे आणि आक्षेप दाखल केले गेले होते. परंतु ते फेटाळण्यात आले.