
महिला, तरुणींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच ओडिशाच्या जगतपूर जिल्ह्यात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी मिळून वारंवार सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर या कृत्याबाबत कोणालाही कळू नये यासाठी त्या मुलीला जिवंत गाडण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे.
इंडिया टुडेमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, भाग्यधर दास आणि पंचनन दास असे या दोन आरोपींची नावे असून ते दोघे भाऊ आहे. हे दोघेही जगतपूरच्या बनाशबरा गावात राहतात. हे दोन भाऊ आणि त्यांचा सहकारी मित्र तुलू बाबू या तिघांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार केला. दीर्घकाळ सुरु असलेल्या अत्याचारांमुळे त्या अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली. सुरुवाचीचे काही दिवस याबाबत कोणालाही समजले नाही. मात्र कालांतराने जसे तिचे पोट दिसू लागले तेव्हा या नराधमांनी तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. यामुळे गावात नाचक्की होईल आणि आपले पितळ उघड पडेल या भीतीने या तिघांनी पीडितेला जीवंतपणी गाडण्याचा प्रयत्न केला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून पीडित मुलगी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटली. याबाबत तिच्या घरच्यांना समजल्यावर मुलीच्या वडिलांनी तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी दोन आरोपी भावांना अटक केली असून तिसऱ्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले. तसेच त्या मुलीलाही रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
सदर घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला सुरक्षेसाख्या गंभीर प्रश्नांवर कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने राज्यामध्ये गुन्हेगारी वृत्तीला पाठबळ मिळतेय का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.