गोड अपवाद…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

>> डॉ. विजया वाड

विवाह. सर्वांगसुंदर घटना. अनेक सामाजिक नियम त्याला लागू. पण या काटेकोर नियमांनाही गोड अपवाद असतातच की…

‘‘आता जी मुलगी सांगून आली ती एकविसावी आहे.’’‘‘मग मी काय करू?’’
‘‘काय करू म्हणजे?’’‘‘पहिल्या अकरा मुली तू नापास केल्या होत्यास.’’
‘‘अरे पण त्या खरंच ‘तशाच’ होत्या.’’
‘‘मग मी दहा नापास केल्या तर बिघडलं कुठे?’’‘‘मुली म्हणजे काय बाहुल्या वाटल्या तुला?’’
‘‘आणि तुला गं?’’‘‘कोल्हापुरातल्या आपल्या घरासाठी योग्य अशा उपवर मुली संपल्या आता.’’‘‘मग काय करू मी? सांगलीत जातो काकूकडे. ती बघेल.’’ ‘‘नाव नको काढू तिचं.’’
‘‘का गं?’’‘‘सांगलीची काकू माझ्या मुलांना जीव लावते नि माझ्यापासून तोडते.’’ ‘‘अगं तोडू म्हणता तुटणारं नातंय का तुझं माझं आई?’’ ‘‘तरी पण रे… मायेचा लोंढा चिरून काढेल माझ्या मायेच्या कवचाला अशी सारखी भीती वाटते.’’
‘‘हे बघ आई, जर कोल्हापुरातल्या उपवर मुली संपल्या असल्या आणि सांगलीकडल्यांचा पर्याय बाद असला तर मी लग्नच करीत नाही.’’‘‘हे बरंय! म्हणजे सांगायला गेलं की टांगायला लावायचं!’’
आई मुलातला हा प्रेमळ संवाद अतिशय रंगात आला असताना शेजघरातली कृष्णा आणि तिचा चिमुकला मेघ अवतरले. ‘‘कशावरून भांडताय?’’
‘‘तुझ्यावरून’’ बाजीराव उत्तरला. ‘‘मी काय बाई केलं?’’ कृष्णानं निर्मळपणे विचारलं.
‘‘तुझे आहे तुजपाशी परी तू अनभिज्ञ कशी?’’ बाजीराव म्हणाला.
‘‘कृष्णा, तू जा बाई. याचं डोकं ना उलटं चालतं.’’ आई म्हणाली.
अहो देखणा, एकोणतीसचा, उंचनिंच, चांगला कमावता, एकुलता मुलगा नि बुटकी, विधवा, एका मुलाची बत्तीस वर्षांची आई, यांची जोडी? कसं वाटतं ऐकायला? नि बघायला तर एकदम विजोड! नो! नाय! नेव्हर! आईचं हृदय जोराजोरात नकारघंटा वाजवू लागलं.
कृष्णाला मोठ्या हिकमतीनं तडीपार करून ती म्हणाली…
‘‘तुझी नं बाजा! उलटीच तऱ्हा आहे सगळी.’’
‘‘मी सहावीत होतो ना आई, तेव्हा कृष्णा नववीत होती. बट आय वॉज मॅड आफ्टर हर.’’
‘‘पण ती गेली ना नवऱ्याचा हात धरून?’’
‘‘अगं विधवा झाल्यावर आईकडे नाही तर कुठं येणार?’’
‘‘हो. हे खरंय म्हणा!’’
‘‘आई, कृष्णाला सुखी व्हायचा हक्क नाही?’’
‘‘व्हावं की रे तिनं सुखी! माझी कशाला हरकत असेल?’’
‘‘मग मला करू दे ना सुखी तिला. मी प्रथमवर आहे, हा का तिचा दोष आहे? अगदी निसर्गनियमाने बाळ झाल्यानं ती दोषी कशी? विवाहानंतर आई झाली ना? आणि आई, नवराच वयानं मोठा हवा असा नियम आहे का? अपवादानेच नियम सिद्ध होतो ना?’’ बाजीराव उत्कटपणे बोलत होता.
‘‘तुझी नं… सारी उलटीच तऱ्हाय बाजा!’’
‘‘ऐक ना गं आई! एक दुःखी जीव मला उद्धारू दे. एका अनाथ मुलाचा मला बाप होऊ दे! अगं तीच माझी सुखाची, आनंदाची कुपीय.’’
ते लग्न झालं प्रिय वाचकांनो! आनंद आनंद ना?-