
सामना प्रतिनिधी । नांदेड
बोगस, बनावट प्रमाणपत्रे सादर करुन वरिष्ठ लिपिक ते उपायुक्त पदांपर्यंत पदोन्नती मिळवून आर्थिक लाभ तसेच अपहार केल्याप्रकरणी मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशावरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात आज १५६ (३) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील उपायुक्त रत्नाकर कांतराव कुक्कडगावकर तथा रत्नाकर वाघमारे यांनी अस्तित्वात नसलेल्या अस्थीव्यंग मंडळाचे ५० टक्के अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन तत्कालीन नगरपालिकेत दि.३० डिसेंबर १९८७ रोजी वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती मिळवली. त्यानंतर दि.१७ जुलै १९९२ रोजी पदाचे पदनाम बदलून अव्वल कारकून असे दुरुस्ती आदेश करुन घेतले. तर त्यानंतर अव्वल कारकून या पदावरुन लेखापाल या पदावर पदोन्नती मिळवून घेतली. सेवा ज्येष्ठतेनुसार रत्नाकर वाघमारे यांच्यापेक्षा सात दिवसांनी सेवाज्येष्ठ असताना देखील प्रकाश येवले यांना पदोन्नतीपासून डावलण्यात आले. तर सेवा ज्येष्ठता नसतानाही दि.१७ फेब्रुवारी २००६ रोजी उपायुक्त पदाचे आदेश निर्गमित करुन तेंव्हापासून ते आजपर्यंत महानगरपालिका तसेच शासनाची फसवणूक केली आहे, असा अर्ज प्रकाश येवले यांनी न्यायालयात याचिकेव्दारे दाखल केला होता.
रत्नाकर वाघमारे हे जन्मतः अपंग नसताना त्यांनी स्वतःचा अपघात झाल्याचे दर्शवून दि.१६ सप्टेंबर १९८७ रोजी ५० टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळविले. अपंगासाठीचे आरक्षण फक्त सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी लागू असताना रत्नाकर वाघमारे यांनी तत्कालीन नांदेड नगरपालिकेची फसवणूक करुन पदोन्नती मिळवून घेतली. बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करुन रत्नाकर वाघमारे यांनी मागील ३१ वर्षापासून महापालिकेची दिशाभूल करुन फसवणूक केली आहे, असेही या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे. या पदोन्नतीचा १९८७ पासून आर्थिक लाभ घेवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार सहायक आयुक्त प्रकाश येवले यांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने या तक्रारीची सुनावणी आज केली असून, या प्रकरणात उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वजिराबाद पोलीस ठाण्याला दिले आहेत. या आदेशावरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात आज रत्नाकर वाघमारे यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































