शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट; तुम्ही प्रत्येक ट्विटची दखल घेणार का? हायकोर्टाची पोलिसांना विचारणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱया नाशिकच्या विद्यार्थ्याला गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांनी तुरुंगात डांबून ठेवल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज नाराजी व्यक्त करत पोलिसांना सुनावले. तुम्ही प्रत्येक ट्विटची दखल घेणार आहात का? अशा प्रकारे कारवाई केलीत तर सर्वोच्च असा पद्म विभूषण पुरस्कार मिळालेल्या शरद पवारांचे नाव नक्कीच खालावेल असे न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या खंडपीठाने पोलिसांना सुनावले.

नाशिकच्या निखिल भामरे या फार्मासिस्ट तरुणाने शरद पवारांविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह ट्विट केले होते. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरेविरोधात ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 18 मे रोजी निखिलला अटक करण्यात आली. नाशिक, ठाणेसह अन्य ठिकाणीही विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून ते रद्द करण्यात यावेत, तसेच याचिका प्रलंबित असताना जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका निखिल याने  न्यायालयात दाखल केली असून त्यावर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एन. जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ट्विट मध्ये पवारांचे नाव नसतानाही पोलिसांनी कारवाई केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने खंडपीठाने प्रशासनाला सुनावले. जर ही बाब शरद पवारांना कळली तर त्यांनाही आवडणार नाही असे न्यायमूर्ती म्हणाले, इतकेच नव्हे तर विद्यार्थ्याला तुरुंगातून सोडण्यास गृह विभागाची हरकत नसल्याबाबत आम्हाला माहिती द्या असे सांगत सुनावणी 16 जून पर्यंत तहकूब केली.